अर्पिता खानला करावा लागलाय वर्णभेदाचा सामना, ट्रोलर्सना पती आयुष शर्माचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 11:29 IST2024-04-23T11:28:26+5:302024-04-23T11:29:01+5:30
आयुषला लग्नात हिरेजडित शेरवानी आणि बेंटले कार मिळाली?

अर्पिता खानला करावा लागलाय वर्णभेदाचा सामना, ट्रोलर्सना पती आयुष शर्माचं सडेतोड उत्तर
सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खानने (Arpita Khan) 2014 साली आयुष शर्मासोबत (Aayush Sharma) लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अर्पिताला कायम तिच्या काळ्या रंगावरुन, वजनावरुन लोकांनी टोमणे मारले आहेत. तर आयुषने तिच्याशी पैशांसाठीच लग्न केलं अशाही अफवा पसरल्या आहेत. या सर्व चर्चांवर आयुष शर्माने सडेतोड उत्तर देत सर्वांची बोलती बंद केली आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला, "अर्पिताने मला सांगितलेलं की लहानपणी तिला सगळे 'काळी' म्हणून हिणवायचे. मात्र ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची. लोकांचं काय ते काहीही बोलतात. त्यांना हवं ते बोलू शकतात. मला तिचा हाच अॅटिट्युड खूप आवडला. माझ्या पत्नीच्या रंगावरुन होणारी चर्चाच मला फार गंमतीशीर वाटते."
तो पुढे म्हणाला, "आपल्या देशात काय सगळेच गोरे आहेत का? मी हिमाचलचा आहे म्हणून माझं रंग गोरा आहे. पण जर कोणाच्या त्वचेचा रंग गडद असेल तर त्यात वाईट काय? रंगावरुन लोक का हात धूवून मागे पडलेले असतात. विचार करा आपण इथे बसून बोलतो की अमेरिकेत ब्लॅक लाईव्ह्स मॅटर. आणि इथे आपल्याच लोकांना आपण रंगावरुन हिणवत आहोत."
आयुषबाबतीतही अनेक अफवा पसरवल्या गेल्या. यावर तो म्हणाला, "मी राजकारणी घरातून आलो आहे. माझे वडील राजनेता आहेत. ते नेहमीच माझ्यामागे उभे असतात. मला पैशांची अजिबात गरज नाही. मला लग्नात हिरेजडित शेरवानी मिळाली आणि खान कुटुंबाने मला बेंटले कार हुंड्यात दिली अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या. (हसत म्हणाला) अरे मी तर आजही अशा महागड्या गिफ्ट्सची वाट पाहत आहे."