हा प्रसिद्ध अभिनेता आहे चंद्रचुर सिंगचा भाऊ, अनेक चित्रपटांमध्ये साकारलीय खलनायकाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 03:10 PM2020-12-22T15:10:35+5:302020-12-22T15:11:52+5:30
चंद्रचुरप्रमाणेच त्याचा भाऊ देखील अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये, वेबसिरिजमध्ये काम केले आहे.
तेरे मेरे सपने या चित्रपटाद्वारे चंद्रचुर सिंगने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने त्यानंतर माचिस, दिल क्या करे, दाग द फायर, जोश, क्या कहेना, आमदनी अठ्ठन्नी और खर्चा रूपय्या अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. तो गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होता. पण काहीच दिवसांपूर्वी तो सुश्मिता सेनसोबत आर्या या वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. तुम्हाला माहीत आहे का, चंद्रचुरप्रमाणेच त्याचा भाऊ देखील अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्स या चित्रपटात आपल्याला अभिमन्यू सिंगला पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर त्याला चित्रपटात म्हणाव्या तशा चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. २००९ मध्ये तो गुलाल या चित्रपटात झळकला. या चित्रपटातील त्याची रणविजयची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. गुलालमुळे त्याच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. या भूमिकेसाठी त्याला पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या रक्तचरित्र या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले. त्याने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिमन्यूने चित्रपटांसोबतच अनेक वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. तसेच अनेक मालिकांमध्ये देखील त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
अभिमन्यूला खूप चांगल्या भूमिका मिळत असताना त्याचा भाऊ चंद्रचुर चित्रपटसृष्टीपासून दूर होता. २००० साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचुरला गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल १० वर्षं लागली. यात त्याने कमावलेला सगळा पैसा देखील संपला... करिअर ठप्प पडले आणि तो आर्थिक संकटात सापडला. अर्थात यानंतरही चंद्रचुरने हिंमत सोडली नाही. ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण त्याचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. पैशांसाठी या काळात चंद्रचूडने अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्यात. अगदी मिळेल ते काम स्वीकारले. पण आर्यामुळे त्याला कित्येक वर्षांनंतर एक खूप चांगली भूमिका मिळाली आणि प्रेक्षकांना त्याची ही भूमिका पसंतीस देखील पडली.