तरी तू बेरोजगार राहणार...! ट्रोलरचा टोमणा अन् अभिषेक बच्चनचे उत्तर
By रूपाली मुधोळकर | Published: October 1, 2020 11:56 AM2020-10-01T11:56:08+5:302020-10-01T11:56:51+5:30
चित्रपटगृह उघडणार या आनंदात ज्युनिअर बच्चनने एक ट्वीट केले. पण हे काय? हे ट्वीट वाचून अनेकांनी अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
अनलॉक 5 अंतर्गत येत्या 15 आक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होत आहेत. केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देताच बॉलिवूडमध्ये आनंद पसरला. अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, आनंद व्यक्त केला. अभिषेक बच्चन त्यापैकीच एक. चित्रपटगृह उघडणार या आनंदात ज्युनिअर बच्चनने एक ट्वीट केले. पण हे काय? हे ट्वीट वाचून अनेकांनी अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सर्वात खास म्हणजे, अभिषेकने या ट्रोलर्सला अतिशय संयमी भाषेत उत्तर देत त्यांची बोलती बंद केली.
चित्रपटगृह उघडण्याची बातमी येताच, ‘आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’,असे ट्वीट अभिषेकने केले. पण अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
The best news of the week!!!! 😁🕺🏽 https://t.co/ysKoB5RMs0
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) September 30, 2020
तू बेरोजगार राहणार आहेस...
अभिषेकच्याट्वीटवर कमेंट करताना एका युजरने त्याला चांगलेच डिवचले.
‘तरीसुद्धा तू बेरोजगार राहणार आहेस, असे नाही का वाटतं?’ अशी कमेंट या युजरने केली.
या यूजरला अभिषेकने उत्तर दिले आहे. ‘ ते तर तुमच्या (पे्रक्षकांच्या) हातात आहे. तुम्हाला आमचे काम आवडले नाही तर आम्हाला नवीन काम काम मिळणार नाही. त्यामुळे आम्ही समर्पित होऊन काम करत असतो आणि उत्तम होईल यासाठी प्रार्थना करतो,’असे अभिषेकने यावर उत्तर देताना लिहिले.
याआधी अभिषेक असाच अनेकदा ट्रोल झाला आहे. सोशल मीडिया युजर्स सर्रास वडिलांशी तुलना करत अभिषेकला ट्रोल करतात. पण दरवेळी अभिषेक त्यांला मोठ्या धीराने आणि संयमाने उत्तर देतो आणि याच पद्धतीने ट्रोलर्सची बोलती बंद करतो.
केवळ पैशांची चिंता...
केवळ आपल्या पैशांची चिंता आहे. यामुळे किती लोकांचा जीव धोक्यात येईल, याची जराही चिंता नाही, असे एका युजरने लिहिले. यावरही अभिषेकने उत्तर दिले. ‘हो, पैसा महत्त्वाचा आहेच. पण मी त्या लाखोंची चिंता करतो, जे आमच्या इंडस्ट्रीत काम करतात आणि येथून पैसा कमावतात,’ असे अभिषेकने लिहिले.
मग सल्ला का दिलास?
कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला देणारा तूच आहेस ना? असा सवाल एका युजरने अभिषेकला केला. यावर अभिषेकने उत्तर दिले. ‘हो, सात आठवड्यांपूर्वी पॉझिटीव्ह आलो होतो. तेव्हापासून आत्तापर्यंत खूप काही बदलले आहेत. आत्ताही आपल्याला सुरक्षित राहण्याचीच गरज आहे. सुरक्षा मापदंड लक्षात घेत सरकारने चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली आहे,’ असे अभिषेकने लिहिले.