'बॉब बिस्वास'साठी अभिषेकने वाढवलं १०५ किलो वजन; लूक पाहून व्हाल बेजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:30 PM2021-12-23T15:30:00+5:302021-12-23T15:30:00+5:30
Abhishek bachchan: 'बॉब बिस्वास' या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याला त्याच्या लूकमध्ये बरेच बदल करावे लागले.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek bachchan) याच्या कलाविश्वातील कारकिर्दीला जवळपास २० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या २० वर्षांमध्ये अभिषेकने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. अलिकडेच त्याचा 'द बिग बुल' आणि 'ब्रीद २' प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटातील त्याच्या कामाचं विशेष कौतुक करण्यात आलं. त्यानंतर आता लवकरच त्याचा 'बॉब बिस्वास' (bob biswas) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमत्ताने त्याने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने चित्रपटासाठी तब्बल १०५ किलो वजन वाढवल्याचं सांगितलं.
भूमिकेला न्याय देण्यासाठी अभिषेकने वाढवलं वजन
'बॉब बिस्वास' या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याला त्याच्या लूकमध्ये बरेच बदल करावे लागले. इतकंच नाही तर या भूमिकेसाठी त्याने तब्बल १०५ किलो वजन वाढवलं आहे.
"या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी मला वजन वाढवणं गरजेचं होतं. खरं पाहायला गेलं तर आम्ही प्रोस्थेटिक मेकअप करुनही तो लूक क्रिएट करु शकलो असतो. परंतु, मला कायम असं वाटतं की तुम्ही मेकअप केला तर तो पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे मग प्रेक्षकांच्या मनाला ती भूमिका भिडावी यासाठी मी माझ्या लूकमध्येच बदल करण्याचं ठरवलं. मी माझं वजन वाढवलं", असं अभिषेक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "जेव्हा तुम्ही मेकअपपेक्षा तुमच्या लूकमध्येच बदल करता. तेव्हा तो बदल पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. तुम्ही ट्रेलर किंवा प्रोमोमध्ये मला पाहिलं असेल. पुरीसारखे फुललेले गाल, पुढे आलेलं पोट. या भूमिकेसाठी मी माझं वजन १०५ किलोपर्यंत वाढवलं होतं. वजन वाढवण्यासाठी मी दररोज सकाळी दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्यासोबत जाऊन कोलकाताच्या मिठाई खायचो. खासकरुन मी गुड सोन्देश आणि इतर स्ट्रीट फूड खूप खाल्ले."
दरम्यान, 'बॉब बिस्वास' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ चित्रपटातील बॉब बिस्वास या पात्रावर आधारित आहे. विद्या बालनच्या कहानी चित्रपटात ही भूमिका शाश्वत चॅटर्जीने साकारली होती. तर, आता बॉब बिस्वास या नावाने येणाऱ्या चित्रपटात अभिषेक ही भूमिका साकारणार आहे.