सर्जरीनंतर अभिषेक बच्चन पोहोचला चेन्नईत, ‘मर्द को दर्द नहीं होता’ म्हणत शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:33 AM2021-08-26T10:33:46+5:302021-08-26T10:34:41+5:30
अभिनेता अभिषेक बच्चन याच्यावर नुकतीच लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. खुद्द अभिषेकने याबद्दल माहिती दिली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा व अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्यावर नुकतीच लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. वडिल अमिताभ बच्चन व बहिण श्वेता अभिषेकला भेटायला रूग्णालयात पोहेचले होते. मात्र अभिषेकला नेमकं काय झालं, हे त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं. आता खुद्द अभिषेकने याबद्दल माहिती दिली आहे. अभिषेकचा गंभीर अपघात झाला. यानंतर त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली.
अभिषेकने इन्स्टाग्रामवर सर्जरीनंतरचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या उजव्या हातावर प्लास्टर दिसतेय. या फोटोसोबत अपघात नेमका कसा झाला, याबद्दल त्याने माहिती दिली आहे. (Abhishek Bachchan undergoes surgery )
पोस्टमध्ये तो लिहितो, ‘गेल्या बुधवारी चेन्नईत माझ्या एका नव्या सिनेमाच्या सेटवर एक भयावह अपघात झाला. यात माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हात ठीक करायचा तर सर्जरी करणं गरजेचं होतं. यामुळे ताबडतोब मुंबईला परतावं लागलं. आता सर्जरी झालीय आणि मी बरा आहे. आता मी पुन्हा चेन्नईला शूटींगसाठी परतलो आहे. ते म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन आणि माझे पापा म्हणाले होते त्यानुसार, मर्द को दर्द नहीं होता.... अरे... अरे... थोड्या वेदना होत आहेत....’ या पोस्टमध्ये अभिषेकने त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
अभिषेक याआधीही चित्रीकरणादरम्यान जखमी झाला होता. धूम 3 च्या सिनेमाच्या शूटींगदरम्यान त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो लवकरच तो ‘बॉस बिस्वास’ आणि ‘दसवीं’ या सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘द बिग बूल’ ओटीटीवर रिलीज झाला होता.