‘त्या’ चुंबनासाठी दाखल केलेला गुन्हा रद्द करा! गायक मिका सिंहची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 06:36 AM2023-04-11T06:36:25+5:302023-04-11T06:38:24+5:30
अभिनेत्री राखी सावंत हिने जबरदस्ती चुंबन घेतल्याचा आरोप करत १७ वर्षांपूर्वी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी गायक मिका सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका
मुंबई :
अभिनेत्री राखी सावंत हिने जबरदस्ती चुंबन घेतल्याचा आरोप करत १७ वर्षांपूर्वी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी गायक मिका सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुन्हा रद्द करण्यास राखी सावंतने संमती दिल्याने मिका सिंहने उच्च न्यायालयात धाव घेतली.
राखी सावंतचे वकील आयुष पासबोला यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले की, गुन्हा रद्द करण्यासाठी राखी सावंतने दिलेल्या सहमतीचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाकडून गहाळ झाले आहे. त्यामुळे नवे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ द्यावी. न्यायालयाने पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पासबोला यांना दिले. मिका सिंहची वकील फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी न्यायालयाला सांगितले की, गेल्या १७ वर्षांपासून हा खटला रखडला आहे. त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. राखी सावंत आणि मिका सिंह यांनी आपापसांतील वाद सोडवले आहेत. ते आता मित्र आहेत.
राखी सावंतच्या गहाळ झालेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, राखी सावंत तिच्या व्यावसायिक कामात व्यस्त आहे आणि त्यांनी आपापसांतील वाद सोडविले आहेत. त्यामुळे मिकावर तिने नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तिची हरकत नाही. २००६ मध्ये मिका सिंहने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी राखी सावंतच्या सहमतीशिवाय तिचे चुंबन घेतले होते.