‘आव्हाने स्विकारा ; मनापासून काम करा’ - तनिष्क बागची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 11:31 AM2017-02-23T11:31:15+5:302017-02-24T11:35:32+5:30

- अबोली कुलकर्णी  सध्या बॉलिवूडमध्ये युवा संगीतकार म्हणून तनिष्क बागची याचे नाव घेतले जात आहे. त्याने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटातील ...

'Accept the Challenges; Work harder '- Tanishq Bagchi | ‘आव्हाने स्विकारा ; मनापासून काम करा’ - तनिष्क बागची

‘आव्हाने स्विकारा ; मनापासून काम करा’ - तनिष्क बागची

googlenewsNext

/>- अबोली कुलकर्णी 

सध्या बॉलिवूडमध्ये युवा संगीतकार म्हणून तनिष्क बागची याचे नाव घेतले जात आहे. त्याने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटातील गाण्यांना धमाकेदार संगीत दिले. त्यातल्या त्यात ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ मधील ‘बन्नो’,‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मधील ‘बोलना’,‘सरबजीत’ मधील ‘रब्बा’ या काही गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तो आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’,‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’,‘मशीन’,‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटांतील काही गाण्यांसाठी संगीत देणार असून ‘हम्मा हम्मा’ आणि ‘तम्मा तम्मा अगेन’ या धमाकेदार रिमेक गाण्यांसाठी चर्चेत आहे. अलीकडेच त्याला ‘अ‍ॅन्युअल मिर्ची म्युझिक अ‍ॅवॉर्ड्स’ मध्ये ‘मोस्ट प्रॉमिसिंग अपकमिंग म्युझिक कंपोजर’ म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा...
 
प्रश्न : तुझ्या संगीतकार बनण्याच्या प्रवासाची सुरूवात कशी झाली?
- मी मुळचा कोलकाताचा. माझे वडील पाश्चात्य संगीत तर आई भारतीय शास्त्रीय संगीताची आराधना करते. घरात सांगीतिक वातावरण असल्यामुळे माझ्यावरही लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले. मी मोठा होऊन कोण होणार? याविषयी मी काही ठरवलेही नव्हते. आपण मोठं झाल्यावर पायलट बनायचे असे डोक्यात होते. मात्र, संगीताची गोडी लागली अन् टीव्हीसाठी संगीत देता देता ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ मधील ‘बन्नो’ हे गाणं करायला मिळालं. या गाण्यापासूनच मला ओळख मिळाली.

प्रश्न : टेलिव्हिजन जगतापासून तुझ्या करिअरची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील पहिल्या ब्रेकविषयी काय सांगशील?
- टेलिव्हिजन जगतासोबत माझा संपर्क अनेक वर्ष होता. या प्रवासात मला बरंच काही शिकायला मिळालं. एका मोठ्या ब्रेकच्या शोधात असताना मला ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ चित्रपटासाठी आॅफर आली. त्यातील कंगना रणौतवर चित्रीत करण्यात आलेलं ‘बन्नो’ हे गाणं तुफान हिट झालं. त्याच गाण्याला मी स्वत:साठी लकी मानतो.

प्रश्न : संगीताची तुझी व्याख्या काय?
-  संगीत माझ्यासाठी सर्वकाही आहे. संगीत म्हणजे मला माझ्या आईप्रमाणे आहे. माझं आयुष्य संपूर्णपणे संगीतावर आधारित आहे. मी जेव्हा आनंदी, दु:खी असतो तेव्हा संगीतच आहे जे सदैव माझ्यासोबत असते. उत्तम संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे पवित्र काम माझ्याकडून होत आहे, याचा मला आनंद आहे.

प्रश्न :  ‘बन्नो’च्या यशानंतरचा तुझा अनुभव कसा होता?
- ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ नंतर लोकांनी माझ्या संगीताची नोंद घ्यायला सुरूवात केली. माझं संगीत लोकांना आवडू लागलं. लोकांनी मी संगीत दिलेल्या या गाण्याला डोक्यावर घेतलं. ‘बन्नो’साठी मला लोकांनी पाठिंबा दिला. प्रेक्षकांनी यानिमित्ताने दिलेली पोचपावती माझ्यासाठी खुप महत्त्वाची होती.

प्रश्न : ‘हाफ गर्लफ्रेंड’,‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’,‘मशीन’,‘मुन्ना मायकेल’ या आगामी चित्रपटांसाठी तू संगीत देत आहेस, तुझ्या या गाण्यांकडून काय अपेक्षा आहेत?
- मी कोणतंही  काम करतांना ते मनापासून करतो. मी केलेलं काम जर मला आवडत असेल तर ते नक्कीच प्रेक्षकांनाही आवडेलच. त्यामुळे मी माझ्या कामाकडून अपेक्षा ठेवत नाही. लहानपणी आई-वडिलांनी शिकवले आहे की, आपण आपले काम करत रहावे. त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते.

प्रश्न : संगीताच्या क्षेत्रात नवोदित संगीतकारांनी कोणत्या बाबींवर विशेषत्वाने लक्ष द्यावे?
- सध्याच्या जगात आव्हाने कोणत्या क्षेत्रात नाहीत? संगीताचं क्षेत्र तर यामध्ये सर्वांत अग्रेसर आहे. नवोदित संगीतकारांनी खुप शिकायला पाहिजे. टेक्निकल बाबींवर लक्ष द्यायला हवे. मनापासून काम करावे. कितीही अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा कार्यतप्तर व्हावे. 

प्रश्न : ‘हम्मा हम्मा’ गाण्याला मिळणाऱ्या यशाबद्दल काय सांगशील?
- ‘ओके जानू’ मधील ‘हम्मा हम्मा’ या गाण्याला सर्वांनी लाईक केले. मी जिथेही जातो तिथे हेच गाणे वाजते. तेव्हा मला स्वत:च्या कामाचा खुप अभिमान वाटतो. लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला मी पात्र ठरतो आहे. ‘हम्मा हम्मा’ नंतर आता ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ मधील ‘तम्मा तम्मा अगेन’ आणि टायटल साँगही आले आहे. या दोन्ही गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहिल्यावर मस्त वाटते.

प्रश्न : ‘मोस्ट प्रॉमिसिंग अपकमिंग म्युझिक कंपोजर’ अवॉर्ड मिळाल्यानंतर जबाबदारी वाढलीय का?
- मी महाराष्ट्रात आल्यापासूनच माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. माझ्या गाण्यांना मिळणारी पसंती पाहून मी उत्तम संगीत देणं अपेक्षित आहे. अलीकडेच मला हा अवॉर्ड मिळाल्याने खुप जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय. नक्कीच ही जबाबदारी मी पार पाडीन. 


प्रश्न :  संगीताच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या  नव्या संगीतकारांमुळे असुरक्षिततेची जाणीव होते का?
- बिल्कुल नाही. कारण स्पर्धा ही असलीच पाहिजे. स्पर्धेशिवाय जगण्याला मजा नाही. मला संगीत देण्याबरोबरच चांगलं संगीत ऐकायलाही आवडतं. त्यामुळे मला नव्या संगीतकारांमुळे असुरक्षिततेची जाणीव होत नाही.

प्रश्न :  आयुष्यात तुझे प्रेरणास्थान कोण आहे? 
- प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरू असतो. माझ्याही आयुष्यात आहे. आई-वडील हे माझे प्रेरणास्थान आहेत. तसेच मी संगीतकार ए.आर.रहेमान यांना माझे प्रेरणास्थान मानतो. त्यांच्याप्रमाणे तर नाही पण नक्कीच त्यांनाही अभिमान वाटावा अशा संगीताची निर्मिती करेन.

प्रश्न :  मराठी चित्रपटांसाठी संगीत देण्याचा विचार केला आहेस का?
- होय. मला मराठी भाषा खुप आवडू लागली आहे. नक्कीच मी मराठी इंडस्ट्रीसाठी काम करेन. सध्या मराठी गाण्यांची क्रेझ मुंबईत खुप आहे. त्यामुळे मला आवडेल मराठी चित्रपटांसाठी काम करायला. तसा मी प्रयत्नही करतोय. 

Web Title: 'Accept the Challenges; Work harder '- Tanishq Bagchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.