‘अनुभवाची शिदोरी माझ्यासाठी महत्त्वाची!’- मोहम्मद झीशान अय्युब
By अबोली कुलकर्णी | Published: December 26, 2018 06:12 PM2018-12-26T18:12:54+5:302018-12-26T18:13:19+5:30
एक चांगला कलाकार असणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच एक व्यक्ती म्हणून समाजात वावरणं गरजेचं असतं. प्रेक्षकांकडून खुल्या दिलाने मिळणारी दाद हीच खरी कलाकारासाठी पावती असते.
अबोली कुलकर्णी
‘ एक चांगला कलाकार असणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच एक व्यक्ती म्हणून समाजात वावरणं गरजेचं असतं. प्रेक्षकांकडून खुल्या दिलाने मिळणारी दाद हीच खरी कलाकारासाठी पावती असते. अशी दाद मला वारंवार मिळो, यासाठी मी माझ्या भूमिकेत समरस होऊन काम करत असतो. यापुढेही माझा तोच प्रयत्न असणार आहे,’ असे मत अभिनेता मोहम्मद झीशान अय्युब यांनी व्यक्त केले. ‘झिरो’ या हिंदी चित्रपटात मोहम्मद झीशान हे गुड्डू सिंग यांच्या व्यक्तीरेखेत दिसत असून त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
* तुम्ही आत्तापर्यंत बॉलिवूडच्या तिन्ही खानांसोबत मोठया पडद्यावर काम केले आहे. आता पुन्हा एकदा शाहरूख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात तुम्ही गुड्डू सिंग यांच्या भूमिकेत दिसत आहात. काय सांगाल तुमच्या अनुभवाविषयी?
- खरंतर खूप छान वाटते. मी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये आमिर खान, ‘रईस’ मध्ये शाहरूख खान, ‘टयुबलाईट’ चित्रपटात सलमान खान यांच्यासोबत काम केले आहे. या तिन्ही खानांचा बॉलिवूडमधील प्रवास आत्तापर्यंत प्रचंड झाला आहे. यांच्यासोबत काम करत असताना मला बरंच काही शिकायला मिळालं. आता पुन्हा एकदा मी गुड्डू सिंगच्या भूमिकेत आहे. मजा आली शाहरूख खान यांच्यासोबत काम करून. अजूनही भविष्यात नक्कीच वेगवेगळया कलाकारांसोबत काम करायला आवडेल.
* मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात तुम्ही सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत दिसत आहात. काय तयारी करावी लागली भूमिकेसाठी?
- नाही, तयारी अशी फार करावी लागली नाही. कारण, मला ऐतिहासिक भूमिका करायला आवडतातच. त्यात ही सदाशिवराव भाऊ यांची भूमिका मला ऑफर झाली तेव्हा मला आनंदच वाटला. काही पुस्तके वाचावी लागली, त्यांचे कार्य जाणून घ्यावे लागले. या चित्रपटात एक कलाकार म्हणून माझ्यात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.
* तुम्ही ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मधून थिएटर ट्रेनिंग घेतली. त्यानंतर २०११ मध्ये तुम्हाला ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासाठी ऑफर आली. आता बऱ्याच चित्रपटात तुम्ही भूमिका साकारल्या आहेत. किती समृद्ध झालंय आयुष्य?
- खूप. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. तसेच आयुष्यातील अनेक उतार-चढाव मी अनुभवले. त्यातूनही अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. याच अनुभवांची शिदोरी माझ्यासोबत कायम राहील, याची मला खात्री वाटते.
* तुमच्यासाठी अभिनय काय आहे?
- माझ्यासाठी अभिनय म्हणजे माझा प्रवास आहे. जो मला माझ्या इच्छाशक्तीपासून ते माझ्या आयुष्याच्या कार्याची मला आठवण करून देतो. एक माणूस म्हणून मला अभिनय सर्वार्थाने समृद्ध बनवतो.
* बॉलिवूड इंडस्ट्रीत आल्यानंतर तुमचे आयुष्य किती बदलले आहे?
- खूप बदलले. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी माझे आयुष्य काहीसे वेगळे होते. आता माझे फॅन फॉलोईंग वाढले आहे. मला अजून अनेक चांगल्या भूमिका करायच्या आहेत. मला असं वाटतं की, माझा ड्रीम रोल मला अजून मिळायचा आहे.