पनामा पेपर्स प्रकरणात का आलं बच्चन फॅमिलीचं नाव? नेमकं काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:16 PM2021-12-20T14:16:21+5:302021-12-20T14:16:56+5:30
Panama Papers Case : पनामा पेपर्स प्रकरण काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलं होतं. दीर्घकाळापासून याचा तपास सुरू आहे. पण या प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव का आलं?
पनामा पेपर्स प्रकरणी ( Panama Papers Case) बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिला ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी दोन वेळा ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलवले होते. पण दोन्ही वेळा ऐश्वर्याने ईडीसमोर हजर राहणे टाळले होते. पनामा केसमध्ये भारतातील 500 लोकांची नावे असल्याचे समोर आले होते. यात राजकारण्यांपासून कलाकार, खेळाडू व बड्या उद्योगपतींचा समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रिंगचा आरोप आहे.
या प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव का आलं? आणि हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेलच.
पनामा पेपर्स प्रकरण काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलं होतं. दीर्घकाळापासून याचा तपास सुरू आहे. 2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. यात सुमारे 300 भारतीयांची नावं समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. ज्यांनी फसवणूक आणि करचुकवेगिरी केली आहे. हे लीक झालेले दस्तऐवज प्रथम Süddeutsche Zeitung या जर्मन वृत्तपत्राने मिळवले होते. अशी सुमारे 12000 कागदपत्रे आहेत, जी भारतीयांशी संबंधित आहेत.
एका रिपोर्टनुसार, यात अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. 1993 मध्ये या कंपनी तयार केल्या गेल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते.
2005 साली ऐश्वर्याला सर्वप्रथम यापैकी एका कंपनीचं संचालक बनवण्यात आलं होतं. नंतर ती या कंपनीची शेअर होल्डरही बनली. या कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्राय. लिमिटेड होतं आणि या कंपनीचं मुख्यालय व्हर्जिन आयलंडध्ये होतं. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन आणि तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये बंद पडली.
सुमारे महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाला होता. त्याने काही कागदपत्रं ईडीला सोपवली होती. आता ऐश्वर्याला ईडीसमोर हजर होणार आहे. ताज्या माहितीनुसार, ऐश्वयाने ईडीसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख मागितली आहे आणि तिची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.
सूत्रांचे मानाल तर अभिषेक आणि ऐश्वर्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही ईडी समन्स बजावण्याची शक्यता आहे.