‘बेल बॉटम’साठी अक्षय कुमारनं 30 कोटींनी कमी केली फी? वाचा काय आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:13 PM2021-06-15T18:13:00+5:302021-06-15T18:13:46+5:30
सध्या चर्चा आहे ती अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या सिनेमाची. या चित्रपटासाठी अक्षयने आपल्या मानधनात कपात केल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar ) म्हणजे बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी सुपरस्टार. इतकेच नाही बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता. एका दिवसाचाही ब्रेक घेता काम करणे आणि वर्षभरात 4-5 सिनेमे हातावेगळे करणे, हे अक्कीचे अगदी ठरलेले गणित. सध्या चर्चा आहे ती अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या सिनेमाची. होय, कशामुळे तर या सिनेमासाठी अक्कीने घेतलेल्या मानधनामुळे. होय, ‘बेल बॉटम’ या सिनेमासाठी अक्षयने त्याच्या मानधनात कपात केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
What waking up to FAKE Scoops feels like! 🙄🥴 https://t.co/jxn1cXT6as
— Akshay Kumar (@akshaykumar) June 14, 2021
अक्षय एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेतो. अनेकदा यापेक्षाही जास्त, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण ‘बेल बॉटम’चा निर्माता वासू भगनानी याने शब्द टाकला आणि अक्षयने मानधनात 30 कोटींची कपात केली, असे वृत्त एका पोर्टलने दिले होते. पण आता खुद्द अक्कीने यावर ट्वीट करत, ही अफवा असल्याचे म्हटले आहे. ‘अशा खोट्या बातम्या तयार करताना कसं वाटतं?’, अशा आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.
No Truth to this news at all https://t.co/6Bh75GZZFP
— Vashu Bhagnani (@vashubhagnani) June 14, 2021
अक्षयच नाही तर वासू भगनानीनेही हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे ट्वीट त्याने केले आहे.
‘बेल बॉटम’ चित्रपटात अक्षयसोबत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिका साकारत आहेत. अक्षय या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा येत्या 27 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
काय म्हटले होते वृत्तात
अक्षयने ‘बेल बॉटम’हा सिनेमा 117 कोटी साईन केल्याचे व्हायरल वृत्तात म्हटले होते. मात्र कोरोना महामारीमुळे ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी अक्षयला फी कमी करण्याची विनंती केली होती आणि या विनंतीला मान देऊन अक्षयने या फीमधून 30 कोटी कपात केल्याचा दावा वृत्तात केला गेला होता. अक्षय कुमार 'लक्ष्मी' सिनेमा दिवाळीत रिलीज झाला. पुढचा सिनेमा 'सूर्यवंशी' रिलीजसाठी तयार आहे. सध्या अक्षयकडे 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'राम सेतु', 'मिशन सिंह', 'रक्षाबंधन' असे अनेक सिनेमे आहेत.