"मै दर्शन जरीवाला के बच्चे की माँ बनने वाली हूँ" महिलेचा दावा, म्हणाली, 'आमचा गंधर्व विवाह झाला'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 02:21 PM2023-12-14T14:21:22+5:302023-12-14T14:30:37+5:30
६५ वर्षीय अभिनेते दर्शन जरीवाला यांनी महिलेचे आरोप फेटाळले असल्याचं कळतंय.
टीव्ही आणि सिनेअभिनेते दर्शन जरीवाला (Darshan Jariwala) अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात कोलकतामध्ये पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. एका महिलेने ही तक्रार दाखल केली असून ती दर्शन जरीवाला यांच्या बाळाची आई होणार असल्याचा दावा महिलेने केला आहे. ही महिला मीडिया इंडस्ट्रीतच काम करते. दर्शन जरीवाला यांच्याशी तिचा गंधर्व विवाह झाला होता असं तिचं म्हणणं आहे. तसेच तिने न्यायासाठी CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला) संपर्क केला आहे.
'गांधी, माय फादर' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले ६५ वर्षीय अभिनेते दर्शन जरीवाला यांनी महिलेचे आरोप फेटाळले असल्याचं कळतंय. सध्या हे प्रकरण विचाराधीन असल्याने महिलेची ओळख लपवण्यात आली आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, दर्शन जरीवाला आणि तिच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचा गंधर्व विवाह झाला होता आणि ती गरोदर राहिली आहे. मात्र दर्शन जरीवाला तिला आणि होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देत आहेत. म्हणूनच तिने CINTAA कडे न्यायाची मागणी केली आहे. तसंच दर्शन जरीवाला यांना असोसिएशनच्या अधिकृत पदावरुन हटवून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
ईटाईम्सने महिलेशी संपर्क केला असता ती म्हणाली की ती आपल्या आत्मसम्मानासाठी लढणार आहे. दर्शन जरीवाला एक सेलिब्रिटी आहेत हे तिला माहित आहे. म्हणूनच तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तिने पोलिसांसमोर अनेक पुरावे सादर केले आहेत.
दर्शन जरीवाला यांच्या वकीलाने दिलं स्पष्टीकरण
दुसरीकडे, दर्शन जरीवाला यांच्या वकील सवीना बेदी यांनी अभिनेते निर्दोष असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्या म्हणाल्या, 'जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीही निष्कर्ष काढू नका. खोट्या आरोपांखाली सेलिब्रिटींना अशा प्रकारे फसवण्यात येतं. याप्रकरणी आम्ही न्यायिक लढाई लढू.'
दर्शन जरीवाला यांनी 1982 साली टीव्ही अभिनेत्री अपरा मेहता सोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगीही आहे. 2003 साली दोघांचा घटस्फोट झाला. २०१० साली दर्शन जरीवाला अनाहिता जहानबख्श इटालिया सोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.
गंधर्व विवाह म्हणजे नेमकं काय?
'गंधर्व विवाह'मध्ये पती पत्नी अग्निच्या साक्षीशिवाय सातफेरे घेत एकमेकांच्या सहमतीने एकमेकांना नवरा बायको मानतात. हिंदू धर्मात गंधर्व विवाहाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र सोबतच याबाबतीत वैचारिक मतभेदही आहेत. राजा दुष्यंत आणि शाकुंतलाने गंधर्व विवाह केला होता. हे विवाहाचे पवित्र रुप मानले जाते कारण हे केवळ प्रेम आणि समर्पणावर आधारित असते. तर दुसरीकडे अग्निची साक्ष नसल्याने याचा विरोध केला जातो.