‘मेहंदी’ फेम अभिनेता फराज खानचे निधन, बॉलिवूडवर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:04 PM2020-11-04T12:04:07+5:302020-11-05T10:36:03+5:30
वयाच्या उण्यापु-या46 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; अखेरच्या क्षणी नव्हते उपचारासाठी पैसै
90 च्या दशकात ‘फरेब’ आणि ‘मेहंदी’ यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता फराज खान याचे आज निधन झाले. तो 46 वर्षांचा होता. अभिनेत्री पूजा भट हिने फराजच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘जड अंत:करणाने ही बातमी देतेय, फराज खान आपणा सर्वांना सोडून गेला. तो एका आणखी सुंदर जगात असेल, अशी आशा करते. तुमच्या मदतीसाठी आभारा. कृपया, त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा,’असे टिष्ट्वट पूजाने केले आहे.
With a heavy heart I break the news that #FaraazKhan has left us for what I believe, is a better place.Gratitude to all for your help & good wishes when he needed it most.Please keep his family in your thoughts & prayers.The void he has left behind will be impossible to fill 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) November 4, 2020
मेंदूच्या संसर्गामुळे फराज खान गेल्या अनेक दिवसांपासून बेंगळुरूच्या रूग्णालयात भरती होती. त्याच्या छातीत संसर्ग झाला होता. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला होता. तेव्हापासून त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. याकाळात आर्थिक अडचणीमुळे उपचार घेणे कठीण झाले होते. अशास्थितीत पूजा भटने त्याच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. तिच्या आवाहनानंतर अनेक लोक त्याच्या मदतीसाठी पुढे आले होते. अभिनेता सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला होता. फराजच्या उपचाराचा जिम्मा त्याने उचलला होता.
फराज खान हा गतकाळातील कॅरेक्टर आर्टिस्ट युसुफ खान ( अमर अकबर अँथनी फेम जेबिसको) यांचा मुलगा आहे. राणी मुखर्जी स्टारर मेहंदी या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
याशिवाय फरेब, पृथ्वी,दुल्हन बनूं मै तेरी, दिल ने फिर याद किया, चांद बुझ गया सारख्या सिनेमात त्याने काम केले होते. त्यानंतर तो टीव्हीवरील काही शोजमध्येही दिसला होता.
साईन केला होता, ‘मैंने प्यार किया’
सलमान खान ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने एका रात्रीत सुपरस्टार झाला. हा सिनेमा आधी फराज खानला ऑफर झाला होता. होय, फराज खान याला सर्वप्रथम ‘मैंने प्यार किया’साठी साईन केले होते.
सुरज बडजात्या यांनी ‘मैंने प्यार किया’साठी अनेक नवीन चेह-यांचे ऑडिशन घेतले होते आणि यातून फराज खानची निवड करण्यात आली होती. चित्रपटासाठी फराजला साइन करण्यात आले आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीखदेखील ठरली. पण ऐनवेळी फराज खूप आजारी पडला. चित्रीकरण करणे त्याला शक्यच नव्हते. त्यामुळे सुरज बडजात्या प्रचंड टेन्शनमध्ये आले.
फराज ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य आहे या मतावरच सुरज ठाम होते. पण फराजची तब्येत सुधारण्याची कुठलेही चिन्हे दिसत नव्हती. अखेर सूरज बडजात्यांना दुसरा पर्याय शोधणे भाग पडले. याचदरम्यान कुणीतरी त्यांना सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजेच सलमान खानचे नाव सुचवले. त्यावेळात सलमानदेखील चित्रपटांच्या शोधात होता. सुरज यांना सलमान ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. फराज खान आजारी पडला नसता तर ही भूमिका फराज खानने साकारली असती. पण कदाचित सुपरस्टार होणे सलमानच्या नशिबात होते.