"आजच्या युगात राम नाही तर रावणच जास्त आहेत" प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:26 PM2024-01-22T12:26:51+5:302024-01-22T12:36:07+5:30
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्याचं वक्तव्य व्हायरल होत आहे.
देशभरातील वातावरण सध्या श्रीराममय झालं आहे. समस्त रामभक्तांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज १२ वाजून २९ मिनिटांच्या मुहुर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. अनेक बॉलिवूड कलाकारही या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. नुकतंच एका अभिनेत्याने केलेलं विधान चर्चेत आहे. आजच्या युगात राम नाही तर रावणच जास्त आहेत असं तो म्हणाला आहे.
सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारणारा अभिनेता निकितन धीरने (Nikitan Dheer) नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. नेहमी नकारात्मक भूमिका करण्यामागचं काय कारण यावर तो म्हणाला, "आम्ही कलाकार आहोत. आमच्यासाठी सर्व भू्मिका वेगळ्या आहेत. आता तर ज्याप्रकारचे चित्रपट येत आहेत त्यात आपले हिरोही निगेटिव्ह भूमिका करत आहेत. आपला समाजच आता असा झाला आहे की जिथे रामासारखं दिसणं कठीण आहे. इथे रावणच जास्त आहेत."
तो पुढे म्हणाला,"केजीएफ 2 बघा. त्यात तो रावण आहे हे तो स्वत: सांगतो. पुष्पा सिनेमा घ्या. त्यातही हिरो निगेटिव्ह व्यक्तिरेखेत आहे. पण तरी लोक यांना फॉलो करत आहेत. आता आलेला अॅनिमल बघा त्यात तरी काय आहे. आपला समाज आता असाच झाला आहे. यालाच तर कलियुग म्हणतात. अमिताभ बच्चन यांचं करिअरही अँटी हिरो फिल्मवरच आधारित होतं. याप्रकारेच रामायणात रामही आहे आणि रावणही आहे. दोन्ही भूमिका कुठे ना कुठे समान आहेत. एखाद्या परिस्थितीत कोण कसा वागतो त्यातून एक राम बनतो आणि एक रावण होतो."
निकितन धीरने 'चेन्नई एक्सप्रेस', 'जोधा अकबर', 'शेरशाह', 'दबंग' सारख्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे. निकितन त्याच्या फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत असतो. त्याचं दमदार व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांना आकर्षित करतं.