'तो मीच, पण फोटो मॉर्फ केलेला', रणवीर सिंगचा न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 09:41 AM2022-09-15T09:41:13+5:302022-09-15T09:42:16+5:30
न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग यानं पोलीस चौकशीमध्ये फोटो मॉर्फ केले गेल्याचा दावा केला आहे.
मुंबई-
न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग यानं पोलीस चौकशीमध्ये फोटो मॉर्फ केले गेल्याचा दावा केला आहे. फोटोशूटमधील व्यक्ती मीच आहे, पण माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली गेली आहे, असं रणवीरनं पोलीस चौकशीत म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणाला आता वेगळ वळण मिळालं आहे. पोलिसांकडून आता फोटोची सायबर टीमच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. यानंतर फोटोसोबत छेडछाड झालीय का? हे स्पष्ट होणार आहे.
न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगविरोधात मुंबईत २६ जुलै २०२२ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानुसार रणवीर सिंग याचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. रणवीर सिंगने न्यूयॉर्कच्या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यापैकी एका फोटोमध्ये रणवीरचा प्रायव्हेट पार्ट दिसत असल्याचा आरोप करण्यात आला. पण रणवीरनं ज्या फोटोत प्रायव्हेट पार्ट दाखवून व्हायरल केला जात आहे तो फोटो आपण अपलोडच केला नसल्याचा दावा केला आहे.
रणवीर जबाबात काय म्हणाला?
"ज्या फोटोमध्ये प्रायव्हेट पार्ट दिसतोय, तो फोटो मी अपलोड केलेला नाहीय. कारण मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेल्या सात फोटोंपैकी तो फोटो नाहीय. कोणीतरी माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली आहे", असं रणवीर सिंगनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. पोलिसांनी आता हा फोटो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला असून त्यात छेडछाड झाली आहे की नाही याची माहिती मिळेल. जर फोटोत छेडछाड केली असली तर रणवीरला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे.