"काम मिळेना, दारु प्यायला लागलो...", रोनित रॉयचा खुलासा; कसं पालटलं नशीब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:33 IST2025-04-02T17:32:54+5:302025-04-02T17:33:24+5:30

रोनित रॉयची सिक्युरिटी कंपनी आहे जी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना सुरक्षा पुरवते.

actor ronit roy gave superhit tv shows owns security company know about his struggle | "काम मिळेना, दारु प्यायला लागलो...", रोनित रॉयचा खुलासा; कसं पालटलं नशीब?

"काम मिळेना, दारु प्यायला लागलो...", रोनित रॉयचा खुलासा; कसं पालटलं नशीब?

गुड लूक्स, डॅशिंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेला अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy). रोनितने 'कसोटी जिंदगी की' मालिकेमुळे ओळखलं जातं. यात त्याने ऋषभ बजाजची भूमिका साकारली होती. नंतर रोनितने काही मालिका आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. काही वर्षांपूर्वी हृतिक रोशनच्या 'काबिल'सिनेमात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला. मात्र एक काळ असा होता जेव्हा रोनितला काम मिळणंच बंद झालं होतं. नुकतंच त्याने आयुष्यातील त्या कठीण प्रसंगांना उजाळा दिला.

रेडकार्पेटला दिलेल्या मुलाखतीत रोनित रॉय म्हणाला, "मला काम मिळणं कमी झालं आणि मी दारु प्यायला सुरुवात केली. त्यानंतर सगळंच उद्धवस्त झालं. माझं आयुष्य खराब झालं. माझ्याजवळ जेवणाचेही पैसे नव्हते. पण तरीही काहीही करुन मी दारु मात्र विकत घ्यायचो. मला नाही माहित दारु कशी यायची पण यायची. माझी ही परिस्थिती बघून एका मित्राने मला बिझनेस सुरु करण्याची कल्पना दिली. तो म्हणाला तुला सिनेमे ऑफर होत नसले तरी तुझा चेहरा आणि नाव लोकप्रिय आहेच. मग मी माझ्या मित्राच्या सिक्युरिटी कंपनीत प्रशिक्षण घेतलं आणि स्वत:ची कंपनी सुरु केली."

तो पुढे म्हणाला, "मी स्वत:ला सावरलं. कंपनी चालवली आणि मोठी केली. सोबतच बॉलिवूड सोडून पुन्हा टीव्हीकडे वळलो. मी टीव्हीकडे शिफ्ट केलं असं छापून आलं. पण हे शिफ्ट नव्हतं तर माझा नाईलाज होता. माझं नशीब खूप चांगलं होतं कारण मला चांगल्या मालिका मिळाल्या. कसोटी जिंदगी की, बंदिनी या मालिका गाजल्या."

मालिकांमधून सुपरहिट झाल्यानंतर रोनित टेलिव्हिजनवरचा सर्वात महागडा अभिनेता बनला होता. तसंच आज त्याची सिक्युरिटी कंपनी बड्याबड्या कलाकारांना सुरक्षा पुरवते. नुकतंच सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्याने रोनितकडेच सुरक्षेची जबाबदारी दिली.

Web Title: actor ronit roy gave superhit tv shows owns security company know about his struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.