अभिनेता सलमान खानचा महाबळेश्वरमधील वाधवानच्या बंगल्यात मुक्काम
By दीपक शिंदे | Published: June 20, 2024 10:35 PM2024-06-20T22:35:41+5:302024-06-20T22:35:54+5:30
वाधवान येस बँक घोटाळ्यातील आरोपी : शूटिंगच्या निमित्ताने ताफ्यासह दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंच्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खान ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल झाला.
देशभरातील पर्यटकांसह दिग्गज राजकीय नेत्यांपासून कलाकारांना भुरळ घालणाऱ्या या निसर्गरम्य महाबळेश्वर नगरीमध्ये उद्योगपती वाधवान यांचा दिवाण व्हिला हा आलिशान बंगला गेली अनेक वर्षे राज्यातील व देशातील राजकीय नेत्यांची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची सरबराई करत आला आहे. हा ‘दिवाण व्हिला’ बंगला कोरोना काळात वाधवान बंधूंचे शेवटचे एकत्रित वास्तव्य ठरले.
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर वाधवान कुटुंबीयांच्या मालकीचा ‘दिवाण व्हिला’ हा आलिशान बांगला असून, या बंगल्यामध्ये हिरवे लॉन, संगमरवराचे आकर्षक असे मंदिर असून, बंगल्याचा हेरिटेज लूक लक्ष वेधून घेणारा आहे. सध्या महाबळेश्वर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून, धुक्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. अशा वेळी सुपरस्टार सलमान खान शूटिंगसाठी बुधवारी येस बॅँक प्रकरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या वाधवान यांच्या बंगल्यात फौजफाट्यासह पाहुणचार घेत आहे. दरम्यान, वाधवान यांच्या बंगल्यात सलमान खान थांबला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे सलमान खान व वाधवान यांचे काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धुक्यामुळे बंगल्यातच थांबला सलमान
सलमान खान सातारला निघाला असता धुक्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो वाधवान यांच्या बंगल्यात थांबला होता. धुके जास्त असल्याने प्रवास करू नये, असा सल्ला मिळाल्याने त्याने या ठिकाणीच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.