'कलाकारांना डोक्यावर चढवून ठेवणारे...'; करण जोहर, फराह खानवर भडकला अभिनेता समीर सोनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 13:42 IST2024-07-28T13:41:41+5:302024-07-28T13:42:31+5:30
करण जोहर, फराह खानबद्दल आणखी काय म्हणाला समीर सोनी?

'कलाकारांना डोक्यावर चढवून ठेवणारे...'; करण जोहर, फराह खानवर भडकला अभिनेता समीर सोनी
अभिनेता समीर सोनी (Samir Soni) अनेक वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. आधी काही मालिका आणि नंतर सिनेमात काम केल्यानंतरही त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र तो फिल्म इंडस्ट्री चांगली ओळखून आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीत करण जोहर (Karan Johar), फराह खान (Farah Khan) यांच्याबद्दल एक दावा केला. त्याच्या दाव्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीची पोलखोल झाली आहे.
समीस सोनीने एका मुलाखतीत कलाकारांच्या अवाजवी मानधनावर भाष्य केलं. बॉलिवूडमध्ये सेटवर कलाकारांना अतिशय रॉयल ट्रीटमेंट मिळते. याच्या खर्चावरही त्याने भाष्य केले. उज्वल त्रिवेदीला दिलेल्या मुलाखतीत समीर सोनी म्हणाला, "मला करण जोहर आणि फराह खानला हे सांगायचं आहे की जर सिनेमा बनवण्याचा तुमचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय तर याला तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुम्हीच स्टार कलाकाराला 100 कोटी देता आणि नंतर स्वत:च म्हणता की कलाकार खूप मानधन घेतात. तुमचीही यात चूक आहे. नाहीतर अनेक कलाकार १ कोटी किंवा ५० लाख घेऊनही काम करतात. कलाकारांना डोक्यावर चढवून ठेवणारे हेच दोघं आहेत."
काही दिवसांपूर्वी करण जोहरने कलाकारांचा प्रवास आणि सेटवर राहण्याचा खर्च यावर भाष्य केलं होतं. टॉपचे कलाकार खूप मानधन मागतात असं तो म्हणाला होता. तर फराह खानने त्याला दुजोरा दिला होता. आता समीर सोनीने या दोघांनाच आरसा दाखवत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
समीर सोनी नुकताच 'मेड इन हेवन' वेबसीरिजमध्ये दिसला होता. 'आय हेट लव्ह स्टोरीज','बागबान' या सिनेमांमध्ये झळकला आहे. त्याची 'परिचय' ही मालिका खूप गाजली होती. आजही तो याच मालिकेमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे.