अन् सुनील सिंकदरलाल कपूर बनले शक्ति कपूर, हिरोच्या गाडीचा अपघात झाला अन् पालटलं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:00 AM2023-09-03T08:00:00+5:302023-09-03T08:00:02+5:30

Shakti Kapoor Birthday: शक्ती कपूर काम शोधत असताना एक घटना घडली आणि त्या घटनेने त्यांचं अवघं जीवनच बदलून टाकलं. घटना होती अपघाताची...

Actor shakti kapoor birthday special story know why he changed his name | अन् सुनील सिंकदरलाल कपूर बनले शक्ति कपूर, हिरोच्या गाडीचा अपघात झाला अन् पालटलं नशीब

अन् सुनील सिंकदरलाल कपूर बनले शक्ति कपूर, हिरोच्या गाडीचा अपघात झाला अन् पालटलं नशीब

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘क्राईम मास्टर गोगो’ अर्थात शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा आज वाढदिवस. शक्ती कपूर यांनी आपल्या फिल्मी करिअरमुळे 700 पेक्षा अधिक सिनेमात  भूमिका साकारल्या. पण यापैकी बहुतांश सिनेमात त्यांच्या वाट्याला आला तो खलनायकाचाच रोल. याच खलनायकांच्या भूमिकांमुळे ‘बॅड बॉय’ म्हणूनही त्यांना ओळखलं जाऊ लागलं. एका पंजाबी कुटुंबात 3 सप्टेंबर 1958 या दिवशी शक्ती कपूर यांचा जन्म झाला.शक्ती कपूर यांचे खरं नाव सुनील सिकंदरलाल कपूर. मग शक्ती हे नामकरण कसं झालं तर सुनील दत्त आणि नर्गिस यांनी त्यांना हे नाव दिलं होतं.

सिनेमात येण्यापूर्वी शक्ती कपूर सुनील आणि नर्गिस यांच्याकडे महिना 1500 रूपयांची नोकरी करत होते. हाताला काम नव्हतं आणि राहायला घर नव्हतं. त्यामुळे जवळजवळ पाच वर्ष शक्ती कपूर  विनोद खन्ना यांच्या घरीही राहीले होते. यादरम्यान शक्ती कपूर यांना ‘कुर्बानी’ (Qurbani) हा सिनेमा मिळाला आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. हा सिनेमा शक्ती कपूर यांना कसा मिळाला, यामागं चांगलीच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. खुद्द शक्ती यांनी कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. तर फिरोज खान यांच्या गाडीसोबत अपघात झाल्यामुळं  शक्ती कपूर यांना ‘कुर्बानी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.

या प्रसंगाबद्दल बोलताना शक्ती कपूर यांनी  सांगितले होते की, ‘सिनेइंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रतिभा हवीच. पण नशीबाचीही साथ हवी, असं मला वाटतं. केवळ प्रतिभा असेल आणि नशीबाची साथ नसेल, तर तुम्ही या इंडस्ट्रीत चार दिवसही टिकू शकत नाही. मला नशीबाची साथ मिळाली आणि म्हणूनच मला पहिला ब्रेक मिळाला. काही वर्षांपूर्वी लिंकिंग रोडहून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर जात असताना माझ्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली. जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा एक उंच देखणा माणूस मर्सिडिजमधून बाहेर पडताना दिसला. ते दुसरे कोणी नव्हे तर फिरोज खान होते. त्यांना गाडीतून बाहेर येताना बघून मी लगेचच पुढे गेलो आणि थेट काम देण्याची विनंती केली. ‘सर, माझे नाव शक्ती कपूर, मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेतला आहे. कृपा करून मला तुमच्या चित्रपटात भूमिका द्या,’ असं एका श्वासात त्यांना मी बोलून गेलो. फिरोज खान यांनी ते ऐकलं आणि एक शब्दही न बोलता ते गाडीत बसून निघून गेले...

त्याच संध्याकाळी मी के. के. शुक्ल या माझ्या जिवलग मित्राच्या घरी गेलो. तो लेखक होता आणि तो फिरोज खान यांच्यासोबत ‘कुर्बानी’ चित्रपटावर काम करत होता. गप्पागप्पांमध्ये अचानक फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ या सिनेमाचा विषय निघाला आणि यानंतर माझ्या मित्रानं मला जे काही सांगितलं ते ऐकून मी हातभर उडालोच. फिरोज खान ‘कुर्बानी’तील एका विशिष्ट भूमिकेसाठी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहेत, जो त्यांच्या गाडीला आज धडकला होता, असं मित्र मला म्हणाला. मी आनंदानं उड्या मारू लागलो, अरे तो मीच..., असं मी माझ्या मित्राला सांगितलं आणि आम्ही खूप वेळ नुसतं हसत सुटलो. यानंतर माझ्या मित्रानं फिरोज खान यांना फोन केला आणि त्यांना माझ्याबद्दल सांगितलं. अशा प्रकारे मला माझ्या आयुष्यातील पहिल्या चित्रपटात म्हणजेच ‘कुर्बानी’ या  चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.’

Web Title: Actor shakti kapoor birthday special story know why he changed his name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.