अभिनेता सोनू सूद सांगणार देशातील कानाकोपऱ्यातील प्रेरणादायी कथा
By तेजल गावडे | Published: October 27, 2021 07:00 AM2021-10-27T07:00:00+5:302021-10-27T07:00:00+5:30
अभिनेता सोनू सूद 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. अनेकांसाठी तो देवदुतच ठरला. आताही लोकांना मदत करण्याचे त्याचे काम अद्याप थांबलेले नाही. आजही तो देशातील अनेकांना मदत करण्यासाठी धडपडतो आहे. दरम्यान आजपासून अभिनेता सोनू सूद नॅशनल जिओग्राफीक इंडिया वाहिनीवरील दहा भागांची सीरिज 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...
: कोरोनाच्या संकटात तू इतक्या लोकांना मदत केली आहेस. तुझे सगळीकडून खूप कौतुक होते, त्यावेळी तुला कसे वाटते?
- जेव्हा लोक आभार मानतात आणि कौतुक करतात. त्यावेळी मला माझ्या आई वडिलांची आठवण येते. दुर्गा पूजा पंडालमध्ये माझी मूर्ती पाहिली, लोक मंदिर बनवतात, लोक आभार मानण्यासाठी घरी येतात. तेव्हा मी माझ्या आई वडिलांना खूप जास्त मिस करतो. ते असले पाहिजे होते. जे त्यांना ओळखतात ते म्हणतात तुझे आई वडिल असते तर त्यांना तुझा खूप अभिमान वाटला असता. पण त्यांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व करू शकलो. लोकांना अडचणीत मदत करण्याची ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. जी पूर्ण करण्याची शपथ मी स्वतः बरोबर घेतली आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. देव मार्ग दाखवेल. त्या मार्गावर मी चालत राहणार आहे. लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
: माणूसकीची प्रेरणा तुला कोणाकडून मिळाली आहे?
- मला लोकांच्या डोळ्यातून प्रेरणा मिळते. कालवाचौकमधील लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि जेव्हा मी त्यांची सोय करू शकलो. देशात ३५० लोकांसाठी मुंबईतून पहिल्यांदा प्रायव्हेट दहा बसेसला परवानगी मिळाली होती.त्यावेळी त्या लोकांच्या डोळ्यातील आनंदाची भावना पाहिली आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली. हा फक्त साडे तीनशे लोकांचा प्रश्न नाही आहे. देशातील साडेतीन लाख, दहा लाख लोकांचा प्रश्न असल्याची जाणीव तेव्हा झाली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी घेतली. तिथूनच या प्रेरणेची ही सुरूवात झाली होती. आजही हा प्रयत्न सुरूच आहे. त्यांचे कोणतेही काम असो, मेडिकल असो किंवा जॉब असो वा शिक्षण त्यांना त्यात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
: 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोबद्दल सांग?
- नेहमी सांगतो की कथा सांगणे ही एक मोठी कला आहे आणि कथा ऐकणे हा अनुभव आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात तसेच सोशल मीडियावर आपण कथा ऐकल्या आहेत. देशात घडलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल बालपणी आई वडील, आजी आजोबा आपल्याला सांगायचे आणि त्या गोष्टींचे खूप कुतहूलही वाटायचे. त्या गोष्टी ऐकायला मज्जा यायची. एक असा काळ आला की सगळे आपापल्या कामात हरवून गेले. त्यानंतर आता 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' हा शो भेटीला आला आहे, ज्यात देशातील लोकांच्या यशोगाथा सांगण्यात येत आहे. देशातील एका कोपऱ्यातील एका यशस्वी व्यक्तीची किंवा कंपनीच्या यशामागची कहाणी समोर येणार आहे. यातून आपल्याला फक्त प्रेरणाच मिळत नाही तर लोकांचे आयुष्य बदलून टाकते. 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' ही अशाच लोकांची, जागांची कहाणी आहे. जी पूर्ण देशाला सांगणार आहोत. अशा कथा सांगण्यासाठी माझी निवड झाल्याचा मला अभिमान वाटतो.बालपणी मला कथा ऐकायला जेवढी मजा आली तेवढीच मजा आता सांगायला येत आहे. कारण लोकांना आम्ही प्रेरीत करत आहोत आणि मी स्वतःही प्रेरीत झालो आहे.
: या शोमधून तुला काय शिकायला मिळाले?
- जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर कोणतीही गोष्ट करणे अशक्य नाही. आपल्या देशात १४० कोटींची लोकसंख्या आहे. छोट्या छोट्या गावातील, शहरातील लोकांनी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आहेत आणि एका भारतीय व्यक्तीने देशाला अभिमान वाटेल अशा गोष्टी केल्या आहेत. तुम्ही छोट्या शहरातील आहात की मोठ्या शहरातील, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, तसेच तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे आहात, या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. जर तुम्ही मनात एखादी गोष्ट करायची ठरवली तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. दररोज जेव्हा मला स्क्रीप्ट मिळत होती तेव्हा मी खूप उत्सुक असायचो. या गोष्टी मी खूप कुतूहलाने ऐकायचो. त्या स्क्रीप्ट वाचल्यानंतर माझ्या ज्ञानातही भर पडली आहे. हा शो जो कुणी पाहेल त्यांच्या आयुष्यातही खूप वृद्धी होईल. हा शो पाहिल्यावर देशातील लोकांचा अभिमान वाटेल आणि भारतात असेही होते हे जाणून घेतल्यावर कमाल वाटेल. आपल्या देशात वेगवेगळी संस्कृती, भाषा , वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. या देशातील वेगवेगळ्या लोकांनी पुढाकार घेत देशात आपले योगदान दिले आहे. देशाला गर्व वाटेल, असे काही केले आहे. देशात मोठे मोठे बोगदे बनवले आहेत. तर एका व्यक्तीने एकट्याने शंभर हेक्टर जमिनीवर जंगल बनवले आहे. कोणी डोंगर फोडून रस्ते बनवले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी देशाला प्रेरीत करतात. एकटा व्यक्तीदेखील खूप काही करू शकतो याची जाणीव या गोष्टी करून देतात. असे शो बनण्याची गरज आहे. लोकांना त्यांच्या ताकदीची ओळख करून देण्यासाठी अशा शोची गरज आहे.
: तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?
- मी दाक्षिणात्य चित्रपट आचार्यमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात मी चिरंजीवीसोबत काम करतो आहे. हा चित्रपट फेब्रुवारीत रिलीज होणार आहे. याशिवाय अक्षय कुमारसोबत मी पृथ्वीराजमध्येही काम केले आहे. हा चित्रपट जानेवारीत रिलीज होणार आहे.