आलिया भट, करण जोहरसह बॉलिवूड अभिनेत्रींच्या इमारतींमधील ११० रहिवाशी निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 07:46 PM2021-12-15T19:46:19+5:302021-12-15T19:50:02+5:30
कोविडचा प्रसार मुंबईत नियंत्रणात आला तरी अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अशा पार्ट्या कोविडच्या प्रसाराचा धोका निर्माण करीत आहेत.
मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीमध्ये सहभागी अभिनेत्री, त्यांचे नातेवाईक असे सहाजण कोविड बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेने तात्काळ त्या राहत असलेल्या इमारती सील करीत तेथील रहिवाशी, घरकाम करणारे आणि जवळच्या संपर्कातील ११० जणांची कोविड चाचणी केली होती. बुधवारी या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कोविडचा प्रसार मुंबईत नियंत्रणात आला तरी अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अशा पार्ट्या कोविडच्या प्रसाराचा धोका निर्माण करीत आहेत. कभी ख़ुशी कभी गम या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त करण जोहर यांनी वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी मागील आठवड्यात पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत हजेरी लावणाऱ्या अभिनेता सोहेल खान यांच्या पत्नी सीमा खान, त्यांचा मुलगा आणि बहीण पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य अभिनेते व अभिनेत्र्यांनी आपली कोविड चाचणी केली होती. यामध्ये करीना कपूर, अमृता अरोरा, संजय कपूरची पत्नी महिप कपूर, करीनाकडे घरकाम करणारी महिला असे सातजण कोविड बाधित आढळून आले आहेत.
महापालिकेने मंगळवारी तातडीने त्या राहत असलेल्या चार इमारती सील करुन ११० लोकांची चाचणी केली होती. या चाचणीत एकाही रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे सर्व रहिवाशांसह महापालिकेनेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या इमारतींवरील निर्बंध आता काढण्यात येत असले तरी एक बाधित रुग्ण असल्यास केवळ तो फ्लॅट, दोन बाधित रुग्ण असल्यास संबंधित मजला सील ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
या सिलिब्रेटींच्या चाचण्या निगेटिव्ह-
अभिनेता सोहेल खान, संजय कपूर आणि त्याची मुलं, मलाईका अरोरा, आलिया भट, करण जोहर.