100 तासांमध्ये तयार झाली आलियाची 'रामायण' साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:15 AM2024-01-25T11:15:44+5:302024-01-25T11:16:36+5:30
Alia bhatt: आलियाची ही साडी तयार करण्यासाठी दोन कारागिरांनी प्रचंड मेहनत केली असून त्यावर अत्यंत बारीक नक्षीकाम करण्यात आलं आहे.
भारताच्या इतिहासामध्ये २२ जानेवारी ही तारीख अत्यंत खास ठरली आहे. या दिवशी आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे देशातील नामवंत मंडळी या सोहळ्याचे साक्षीदार झाले. राजकीय व्यक्तींपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टदेखील (Alia bhatt) उपस्थित होती. विशेष म्हणजे यावेळी आलियाने नेसलेली साडी सगळ्यांमध्ये चर्चेत राहिली. ही साडी अत्यंत खास असून तिची किंमत थक्क करणारी आहे.
प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आलिया पारंपरिक भारतीय पोशाखात सहभागी झाली होती. यावेळी तिने स्काय ब्ल्यू रंगाची छान लाइट वेट साडी परिधान केली होती. मात्र, ही साडी अत्यंत खास होती. कारण, या साडीवर रामायणातील काही खास प्रसंग रेखाटण्यात आले होते. ही साडी तयार करण्यासाठी प्रचंड वेळ, मेहनत आणि तितकीच रक्कम मोजण्यात आली आहे.
१०० तासांच्या मेहनतीने तयार झाली आलियाची साडी
आलियाच्या साडीवर रामायणातील काही प्रसंग रेखाटण्यात आले होते. यात तिच्या पदरावर अत्यंत बारीक असं नक्षीकाम करण्यात आलं होतं. हे नक्षीकाम करण्यासाठी २ कारागिरांनी तब्बल १०० तास मेहनत केली आहे.
किती आहे या साडीची किंमत
आलियाने परिधान केलेली साडी madhurya_creation या ब्रँडने तयार केली आहे. हा ब्रँड भारतातील पुरातन वास्तूंचं साडीवर हाताने डिझाइन करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचं सांगण्यात येतं. ही साडी मैसूर सिल्क प्रकारातील असून त्याची किंमत तब्बल ४५ हजार रुपये इतकी आहे.
काय आहे साडीचं वैशिष्ट्य?
आलियाच्या साडीवर शिव धनुष्य, सुवर्णमृग, हनुमान माता सीतेला अंगठी देण्याचा प्रसंग, राजा दशरथ, सीता अपहरण असे काही महत्त्वाचे प्रसंग पट्टचित्र शैलीत रेखाटले आहेत.