भाग्यश्रीला पतीपासून दीड वर्ष वेगळे राहावे लागले, 30 वर्षांनंतर अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली-भीती होती..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:39 PM2023-03-16T19:39:19+5:302023-03-16T19:49:09+5:30
भाग्यश्री आणि हिमालय दसानी या परफेक्ट दिसणाऱ्या कपलमध्ये सगळं काही इतकं परफेक्ट नव्हतं. एक काळ असा होता की हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते.
भाग्यश्री(Bhagyashree) ने 1989 मध्ये आलेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाद्वारे चित्रपटांच्या दुनियेत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटापासून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. तिच्या पहिल्या चित्रपटातून रातोरात स्टार बनल्यानंतर भाग्यश्रीला इंडस्ट्रीतील स्टार म्हणून पाहिले जात होते. पण त्यावेळी अभिनेत्री त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न टाळत होती. तर दुसरीकडे, भाग्यश्रीने तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढच्याच वर्षी घरातून पळून जाऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले.
हिमालय दसानीसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने ठरवलं होतं की ती फक्त तिच्या पतीसोबतच चित्रपट करणार आहे. भाग्यश्री आणि हिमालय तीन चित्रपटांमध्ये एकत्र दिसले, पण एकही चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर या अभिनेत्रीने चित्रपटांना कायमच रामराम केलं आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली. पण लग्नाच्या 30 वर्षांनंतर या अभिनेत्रीने पतीशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे.
हिमालय आणि भाग्यश्री यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. भाग्यश्रीने तिच्या प्रेमकथेविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र. आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो काळ माझ्यासाठी खूपच वाईट होता. हिमालय माझ्या आयुष्यात असणार नाही. माझे लग्न दुसऱ्या कोणासोबत होईल असे मला सतत वाटत होते. जवळजवळ दीड वर्षं आम्ही एकत्र नव्हतो. त्या काळाची आजही आठवण आली तरी अंगावर शहारा येतो. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती.
हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही आमच्या नात्याला स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटांत हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या केवळ एवढेच जण आमच्या लग्नात हजर होते.