मला पाहून बायका त्यांच्या नवर्यांना लपवायच्या...; अभिनेत्री बिंदू यांचा शॉकिंग खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:34 PM2021-12-06T12:34:18+5:302021-12-06T12:35:57+5:30
बिंदू! 70 च्या दशकातील एक गाजलेलं नाव. 70 व 80 च्या दशकात चित्रपट म्हटले की, नायिकेसोबत खलनायिका हमखास दिसायची. याच काळात अभिनेत्री बिंदू यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
बिंदू! 70 च्या दशकातील एक गाजलेलं नाव. 70 व 80 च्या दशकात चित्रपट म्हटले की, नायिकेसोबत खलनायिका हमखास दिसायची. याच काळात अभिनेत्री बिंदू (Bindu) हिने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. कधी नायिका, कधी खलनायिका तर कधी आयटम डान्सर अशा अनेक भूमिकेत पडद्यावर झळकलेल्या बिंदूनं मॉडेलिंग करायला सुरुवात केली ती घरच्या परिस्थितीमुळे. सहा भावंडांमध्ये बिंदू सगळ्यात मोठी होती. पण ती 13 वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं आणि घराची संपूर्ण जबाबदारी बिंदूवर आली. पैसे मिळवण्यासाठी बिंदूने मॉडेलिंग सुरु केलं आणि 1962 मध्ये तिला दिग्दर्शक मोहन कुमार यांच्या ‘अनपढ’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तिनं कधीच मागे वळून बघितलं नाही. अनेक भूमिका साकारल्या आणि या भूमिका जिवंत करताना अनेक बरे-वाईट अनुभवही त्यांच्या वाट्याला आलेत. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बिंदू यांनी या अनुभवांचा खुलासा केला.
बिंदू यांनी अनेक निगेटीव्ह भूमिका साकारल्या आणि या भूमिकांचा त्यांच्या ख-या आयुष्यावरही परिणाम झाला. याबद्दल त्यांनी सांगितलं, ‘अनेक चित्रपटात निगेटीव्ह रोल करता करता लोक मला ख-या आयुष्यातही खलनायिका समजू लागले होते. पुरूष मला भेटायला यायचे तेव्हा त्यांच्या बायका अगदी त्यांना खेचून माझ्यापासून दूर घेऊन जायच्या. मला पाहिलं की, आपल्या नवर्यांना लपवायच्या. मी त्यांच्या नवर्यांना पळून नेईल, अशी भीती त्यांना वाटायची. अनेक जण मला शिव्या घालायचे. अर्थात आता ही परिस्थिती राहिलेली नाही. रिल लाईफ आणि रिअल लाईफ यातील फरक लोकांना कळू लागला आहे.’
लोक मला शिव्या द्यायचे. एकदा एका कार्यक्रमात राखीनं मला मिठी मारली. त्यावेळी राखी बिंदूला मिठी का मारतेय? असं काही लोक बोलतांना मी ऐकलं. माझ्यासारख्या वाईट बाईला राखी सारखी मोठी अभिनेत्री मिठी मारतेय, हे लोकांना आवडलेलं नव्हतं. अर्थात मी कधीच लोकांच्या शिव्या मनावर घेतल्या नाहीत. मी त्यांना माझ्या कामाचं बक्षिस म्हणून स्वीकारलं, असेही त्यांनी सांगितलं.