मराठमोळ्या मुलीने दहा वर्षे केले हिंदी चित्रपटात साईड अभिनेत्रीचे रोल, आता आहे करोडोंची मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:23 PM2019-10-11T16:23:51+5:302019-10-11T16:27:07+5:30
काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मराठमोळी मुलगी इशा कोपीकर. जवळपास दहा वर्षे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत सहअभिनेत्री म्हणून काम केलं. पहिल्याच चित्रपटात ह्रतिक रोशनसह तिला 'फिजा' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
अभिनयासोबतच तिने आयटम नंबरमधूनही रसिकांची मनं जिंकली. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले खल्लास गाणं इतकं हिट ठरलं की रसिकांनी तिला खल्लास गर्ल असं नाव दिलं. यानंतर ‘प्यार, इश्क और मोहब्बत’, ‘आमदनी अठन्नी और खर्चा रूपया’, ‘ कंपनी, ‘ ‘काँटे’, ‘दिल का रिश्ता’, ‘कृष्णा कॉटेज’ ‘हॅलो’, ‘एक विवाह ऐसा भी’ अशा चित्रपटात ती झळकली. दक्षिणेकडील तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटातही भूमिका साकारल्या.
'मात' आणि 'फ्रेंडशिप अनलिमिटेड' या मराठी चित्रपटातही ती झळकली. इंदर कुमारसोबतच्या कथित रिलेशनशिपमुळेही ती चर्चेत राहिली होती. इंदर कुमारने याबाबत खुलासे केले होते. मात्र त्याच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर २००९साली ती हॉटेल व्यावसायिक रोहित उर्फ टिम्मी नारंगसह रेशीमगाठीत अडकली.
टिम्मी नारंग अनेक हॉटेल्सचा मालक आहे. मुंबईतील ‘लश रेस्टारंट’ आणि ‘द पॅलॅडियम’ हे त्याच्या मालकीचे आहेत. इशा आणि टिम्मीची ओळख अभिनेत्री प्रीती झिंटाने करून दिली होती. आजघडीला इशा आपल्या कुटुंबासोबत सुखी आहे. त्यांच्या आयुष्यात ३ वर्षाची मुलगी रायना आहे. इशाची रुपेरी पडद्यावर जादू चालली नसली तरी ती अनेक हॉटेल्सची मालकीण आहे आणि तिच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे.