विकास बहल माझ्यासोबत शारीरिक संबंधांबाबत चर्चा करायचे - कंगना राणौत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 08:32 AM2018-10-07T08:32:18+5:302018-10-07T09:53:25+5:30
'क्वीन' सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. अभिनेत्री कंगना राणौतनं पीडित महिलेचं समर्थन करत या वादात उडी घेतली आहे.
मुंबई - 'क्वीन' सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. 2015साली बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'बॉम्बे व्हेलवेट' सिमेमाच्या प्रमोशनदरम्यान क्रू टीममध्ये सहभागी असणाऱ्या एका महिलेनं विकासवर छेडछाडीचा आरोप केला आहे. याबाबत अनुराग कश्यपकडे तक्रारही करण्यात आली होती, मात्र यानंतरही कोणती कारवाई करण्यात आली नसल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. दरम्यान, आता अभिनेत्री कंगना राणौतनं पीडित महिलेचं समर्थन करत या वादात उडी घेतली आहे.
विकास बहलच्या 'क्वीन' सिनेमामध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या कंगना राणौतनं आपल्या अनुभवाचे कथन करत पीडित महिलेला पाठिंबा दर्शवला आहे. कंगनानं दिग्दर्शक विकास बहलसोबत 'क्वीन' सिनेमामध्ये काम केले आहे. विकास बहलवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना कंगनानं म्हटले की, 'मी या पीडितेवर पूर्णतः विश्वास ठेऊ शकते. कारण 2014 साली आम्ही 'क्वीन' सिनेमाचं शूटिंग करत होतो तेव्हा विकास विवाहित होते. आपल्या पार्टनरसोबतच्या शारीरिक संबंधांबाबतच्या गोष्टी ते बऱ्याचदा माझ्यासोबत शेअर करायचे. मी लोकांना किंवा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर कोणतेही विधान,मत व्यक्त करत नाही, पण आपण अनुभवू शकतो की हे सर्व त्यांच्यासाठी एक व्यसन झाले आहे'.
(‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स!)
कंगना पुढे असंही म्हणाली की, ''विकास दररोज रात्री पार्टीसाठी जातात आणि मी अशा पार्टींमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरुन ते माझी खिल्ली उडवायचे. जेव्हा कधीही ते मला भेटायचे तेव्हा विचित्र पद्धतीनं मला आलिंगन द्यायचे, मानेला स्पर्श करायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो, असे सांगायचे. त्यांच्या हालचालींवरुन त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकीचे आहे, असे नेहमी वाटायचे. दरम्यान, आता फँटम सिनेमा संपल्यानंतर या प्रकरणावर सर्वाधिक चर्चा होत आहे. यापूर्वीही हा मुद्दा उचलण्यात आला होता आणि अतिशय सहजरित्या हे प्रकरण दाबवण्यातही आले. मी तेव्हाही पीडितेला पाठिंबा दर्शवला होता.''
(Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक!)
त्यावेळेस हरियाणातील गोल्ड मेडलिस्ट खेळाडूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं स्क्रिप्ट घेऊन विकास माझ्याकडे आले होते. मात्र पीडित व्यक्तीला समर्थन केल्याच्या कारणामुळे त्यांनी माझ्यासोबत बोलणे बंद केले. विकासच्या न बोलण्यानं मला काहीही फरक पडत नाही. यानंतर मीदेखील त्यांना कधीही संपर्क केला नाही. कारण जे योग्य असेल तेच बोलणार, असे मी ठरवले होते.
दरम्यान, कंगनानं केलेल्या आरोपांवर आता विकास बहल काय प्रतिक्रिया देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.