अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी, डायमंड नेकलेससह अमेरिकी डॉलर्सही लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:34 IST2025-01-08T12:33:52+5:302025-01-08T12:34:36+5:30
बापरे! डायमंड नेकलेसची किंमत किती होती माहितीये का?

अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी, डायमंड नेकलेससह अमेरिकी डॉलर्सही लुटले
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो (Poonam Dhillon) यांच्या घरी चोरी झाली आहे. अनेक महागड्या वस्तू आणि कॅशही चोरीला गेली आहे. पूनम ढिल्लो यांचा खार येथील उच्चभ्रू परिसरात आलिशान फ्लॅट आहे. इथेच ही चोरी झाली आहे. या फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा अनमोल राहतो. तर पूनम कधीकधी त्या फ्लॅटमध्ये राहायला येतात. दरम्यान त्यांच्या घरातून किती लाखांची चोरी झाली वाचा.
पूनम ढिल्लो यांच्या खास येथील फ्लॅटमधून १ लाख रुपयाचा डायमंड नेकलेस, ३५ हजार रुपयांची रोख आणि काही अमेरिकी डॉलरही चोरीला गेले. पोलिसांनी चोराला अटक केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पूनम यांच्या घरी पेंटिंगचं काम सुरु होतं. २८ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत हे काम चालू होतं. याचाच चोराने फायदा उचलला आणि घरातील कपाट खुले पाहून त्याने सामान चोरी केलं.
पूनम जास्त करुन जुहू मध्येच राहतात. काही वेळेस त्या मुलासोबत खार येथे येतात. चोराने चोरी केलेली काही कॅश खर्चही केली आहे. पूनमचा मुलगा दुबईवरुन घरी आला तेव्हा त्याला बरंच सामान गायब झालेलं दिसलं. अनमोलने पोलिसांना याची माहिती दिली आणि यानंतर पोलिसांनी अन्सारी नावाच्या आरोपीला अटक केली.
पूनम ढिल्लो यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी शेवटचं 'जय मम्मी दी' सिनेमात काम केलं. पूनम यांचे ८०-९० च्या दशकात अनेक चित्रपट गाजले. पत्थर के इंसान, जय शिवशंकर, रमैय्या वस्तावैय्या, बंटवारा या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पूनम यांना पलोमा ही मुलगीही आहे. तिनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिला इंडस्ट्रीत यश मिळवता आलं नाही.