सलमान खानची ही नायिका आता राहाते टोकियोत, पोस्ट केलाय कुटुंबियांसोबतचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 09:00 PM2020-04-26T21:00:00+5:302020-04-26T21:00:03+5:30
या अभिनेत्रीला तीन मुलं असून तिच्या लग्नाला नुकतीच दहा वर्षं झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सलमान खानचा जुडवा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला करिश्मा कपूर आणि रंभा या नायिकांना पाहायला मिळाले होते. रंभाने या चित्रपटासोबतच सलमानच्या बंधन, घरवाली बाहरवाली, बेटी नं.1 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. जानी दुश्मन या चित्रपटानंतर ती कोणत्याच हिंदी चित्रपटात झळकली नाही.
बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर देखील ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होती. पण लग्नानंतर तिने चित्रपटांत काम करणे कमी केले. ती टेलिव्हिजनवरील काही कार्यक्रमांमध्ये 2017 पर्यंत परीक्षकाची भूमिका बजावत होती. पण आता ती चित्रपटसृष्टीपासून दूर असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या कुटुंबियांसोबत घालवते.
रंभा चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या लग्नाला नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले असून लग्नाचा वाढदिवस तिला लॉकडाऊनमुळे घरातच साजरा करावा लागला. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात तिचे पती आणि मुलांना आपल्याला पाहायला मिळत आहे.
रंभाने हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच काही भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने 2010 मध्ये इंद्रकुमार प्रथमन्थान या व्यवसायिकासोबत लग्न केले होते. ते मुळचे चेन्नईचे असले तरी त्यांचा व्यवसाय टोकियोत आहे. ती गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत टोकियोमध्येच राहाते. त्या दोघांना दोन मुली असून एक मुलगा आहे. तिच्या फॅन पेजवरील अकाऊंटवर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. या फोटोत तिच्या कुटुंबियांचे फोटो देखील असून तिची मुले खूपच छान आहेत. रंभाचे फोटो पाहिले तर तिच्यात काहीच बदल झालेला नाहीये असेच आपण म्हणू शकतो. कारण आजही रंभा तितकीच सुंदर दिसते.
रंभाने अतिशय कमी वयात अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. केवळ 15 वर्षांची असताना तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तिला दाक्षिणात्य चित्रपटांच्या अनेक ऑफर मिळाल्या लागल्या. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने आजवर 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे बालपण आंध्रप्रदेशमध्ये गेले असून ती सातवीत असताना तिच्या शाळेतील एका कार्यक्रमाला दिग्दर्शक हरीहरण यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनीच तिला सरगम या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात लाँच केले.