विल स्मिथच्या पत्नीप्रमाणेच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीलाही होता गंभीर आजार; केसगळतीमुळे झाली त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:45 PM2022-03-31T14:45:57+5:302022-03-31T14:46:43+5:30
Sameera reddy: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या या प्रकारानंतर समीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने या आजाराविषयी जनजागृती करायचा प्रयत्न केला आहे.
यंदाचा ऑस्कर (Oscars 2022) पुरस्कार सोहळा विविध कारणांसाठी चर्चेत आला. यात अभिनेता विल स्मिथने मंचावर जाऊन होस्ट क्रिस रॉकला लगावलेल्या कानशिलाचं प्रकरण चांगलंच चर्चेत राहिलं. विशेष म्हणजे हे प्रकरण हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत चांगलंच गाजलं. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये विल स्मिथच्या पत्नीला असलेल्या आजाराची खिल्ली उडवण्यात आली होती. मात्र, हा आजार एका बॉलिवूड अभिनेत्रीलाही असल्याचं समोर आलं. या अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आजापणाविषयी माहिती दिली.
विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट हिला एलोपेसिया एरीटा ऑटोइम्यूनर डिसऑर्डर हा आजार आहे. या आजारामध्ये डोक्यावरील सगळे केस गळतात. परिणामी, टक्कल पडायची वेळ येते. जेडाच्या याच आजारपणावरुन ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तिची खिल्ली उडवण्यात आली होती. ज्यामुळे विल स्मिथने क्रिस रॉकला कानशिलात लगावली. या प्रकारानंत अभिनेत्री समीरा रेड्डीने या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. ती देखील या आजाराला सामोरी गेल्याचं तिने सांगितलं आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या या प्रकारानंतर समीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने या आजाराविषयी जनजागृती करायचा प्रयत्न केला आहे. समीराला २०१६ मध्ये हा आजार झाला होता. याविषयी सांगत असताना तिने तिचा अनुभव शेअर केला.
"ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या प्रसंगानंतर मला एक कळून चुकलं, की आपल्या प्रत्येकाची लढाई वेगवेगळी आहे आणि आपण त्यावर मातही करतोय. आपल्याला इतरांसाठी एक सुरक्षित जागा निर्माण करण्याची गरज आहे, " असं समीरा म्हणाली.
एलोपेसिया एरीटा म्हणजे काय?
"हा एक ऑटो इम्यून डिजीज आहे. ज्यावेळी तुम्हाला एलोपेसिया एरीटा होतो त्यावेळी तुमची इम्युनिटी सिस्टीमच्या पेशी तुमच्या केसांच्या छिद्रांना घेरतात. आणि, त्यांच्यावर हल्ला करतात. ज्यामुळे केस गळू लागतात. सहाजिकच आहे. त्यामुळे डोक्यावर टक्कल पडू लागतं. मला २०१६ मध्येच या आजारपणाविषयी कळलं. ज्यावेळी अक्षयने माझ्या डोक्यावरील काही ठिकाणचे केस कमी झाल्याचं सांगितलं.एका महिन्यात जवळपास २ ते ३ ठिकाणी मला केस विरळ झाल्याचं दिसून आलं. पण,या आजाराचा सामना करणं खरंच कठीण आहे. या आजारामुळे इतरांना त्याचं संक्रमण होत नाही किंवा इतरांना काही त्रासही होत नाही", असं समीरा म्हणाली.
दरम्यान, समीराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे. तिने उघडपणे ही गोष्ट सांगितल्यामुळे अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.