शिल्पा शेट्टीचं खरं नाव माहितीये का? ऐकून वाटेल आश्चर्य; आईच्या सांगण्यावरुन केलेला बदल
By ऋचा वझे | Updated: February 24, 2025 16:00 IST2025-02-24T15:59:55+5:302025-02-24T16:00:49+5:30
शिल्पा शेट्टीचं खरं नाव होतं भलतंच!

शिल्पा शेट्टीचं खरं नाव माहितीये का? ऐकून वाटेल आश्चर्य; आईच्या सांगण्यावरुन केलेला बदल
'धडकन' सिनेमातून शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सिनेमातील तिची अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबतची केमिस्ट्री खूप गाजली. तसंच यातील गाणी तर आजही लोकप्रिय आहेत. शिवाय या सिनेमात शिल्पा कमालीची सुंदर दिसली आहे. हा तिच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट होता. त्याआधी तिने 'बाजीगर' मधून हिंदी सिनेसृष्टीतून पदार्पण केलं होतं. पण अख्ख्या जगाला शिल्पा म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्रीचं खरं नाव माहितीये का?
शिल्पा शेट्टीचा जन्म ८ जून १९७५ रोजी झाला. तिची आई सुनंदा शेट्टी ज्योतिषी आहेत. लेकीचा जन्म होताच त्यांनी तिचं नाव 'अश्विनी' ठेवलं होतं. शाळेत प्रवेश घेतल्यावरही तिचं हेच नाव होतं. मात्र जेव्हा शिल्पाने मनोरंजनसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने आईच्याच सांगण्यावपुन नाव बदललं. त्यांनीच लेकीसाठी 'शिल्पा' हे नाव सुचवलं. अंकशास्त्रानुसार अश्विनीपेक्षा 'शिल्पा' हे नाव तिच्या करिअरमध्ये उपयोगी ठरेल असं त्या म्हणाल्या होत्या. म्हणून मनोरंजनसृष्टीत यायच्या आधी तिने शिल्पा शेट्टी नाव लावायला सुरुवात केली.
शिल्पाने 'बाजीगर', 'धडकन' शिवाय 'रिश्ते', 'मै खिलाडी तू अनाडी', 'लाईफ इन अ मेट्रो' या सिनेमांमध्येही काम केलं. शिल्पा उत्तम डान्सरही आहे. 'दोस्ताना' मधील तिचं आयटम साँग खूप गाजलं होतं. २००९ साली शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्नगाठ बांधली. तिला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. नंतर शिल्पा अनेक डान्स रिएलिटी शोजमध्ये परीक्षक होती. २०२३ मध्ये तिचा 'सुखी' सिनेमा रिलीज झाला ज्याचं खूप कौतुक झालं.