मोजून तीन सिनेमे करून बॉलिवूडमधून गायब झाली ही सुंदर हिरोईन, संजय दत्तची आहे मामेबहीण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 02:41 PM2020-05-29T14:41:22+5:302020-05-29T14:43:33+5:30
काही मोजके सिनेमे केलेत आणि बॉलिवूडपासून दुरावलेत असे अनेक स्टार्स आहेत. अशीच एक अभिनेत्री...
काही मोजके सिनेमे केलेत आणि बॉलिवूडपासून दुरावलेत असे अनेक स्टार्स आहेत. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव जाहिदा हुसैन. देवानंद यांच्या ‘ग्लॅम्बलर’ या सिनेमात झळकलेली अभिनेत्री. अनोखी रात,आणि प्रेम पुजारी या सिनेमांसाठी जाहिदा यांना ओळखले जाते.
या जाहिदाचे संजय दत्तशी कनेक्शन आहे, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. होय, जाहिदा संजयची आई व अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या भावाची मुलगी आहे.
नर्गिस यांच्या आई जद्दनबाई यांनी तीन लग्ने केली होती. पहिले लग्न नरोत्तम दास खत्री यांच्याशी. यावेळी त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. पहिल्या लग्नापासून त्यांना अख्तर हुसैन हा मुलगा झाला. याच अख्तर हुसैन यांची जाहिदा ही मुलगी. या नात्याने ती संजय दत्तची मामेबहीण आहे.
जाहिदाने 1968 साली ‘अनोखी रात’ या चित्रपटातून अभिनयास सुरुवात केली. यानंतर 1970 साली ‘प्रेम पुजारी’ हा तिचा दुसरा सिनेमा. देवानंदसोबतचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता. पुढच्याच वर्षी देवानंद यांच्याचसोबत ‘ग्लॅम्बलर’ या सिनेमात जाहिदाची वर्णी लागली. या चित्रपटातील ‘चूडी नहीं हे ये मेरा दिल है...’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते.
देवानंद यांच्यासाठी वेड्या असणा-या तरूणींची यादी बरीच मोठी होती. जाहिरा ही सुद्धा त्यांची फॅन होती.
1972 मध्ये देवानंद यांनी जाहिराला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमात बहीणीची भूमिका देऊ केली होती. पण तिने ही भूमिका नाकारली. कारण तिला देवानंद यांची बहीण बनायचे नव्हते. पुढे ही भूमिका झीनत अमानने साकारली.
जाहिदाने करिअरमध्ये केवळ तीन चित्रपट केलेत आणि पुढे सिनेसृष्टीला कायमदा रामराम ठोकला. बिझनेसमॅन केसरीनंदन सहाय यांच्यासोबत लग्नगाठ बांधून ती संसारात रमली. जाहिदाला दोन मुले आहेत. यापैकी एक निलेश सहाय याला तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिले असेल. 2011 साली गणेश आचार्यच्या ‘एंजेल’मधून त्याने डेब्यू केला होता.