राखी सावंतला त्रास दिल्यामुळे सलमानने धमकावलं? तुरुंगातून बाहेर आलेल्या आदिलचा खुलासा म्हणाला, “मी त्याला...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:46 AM2023-08-22T11:46:19+5:302023-08-22T11:48:31+5:30
तुरुंगात बाहेर आलेल्या आदिलने राखी सावंतवर गंभीर आरोप करत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने काही महिन्यांपूर्वी पती आदिल खानविरोधात तक्रार दाखल करत त्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अनेक महिने तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलेल्या आदिलने सोमवारी(२१ ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आदिलने राखीवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. याबरोबर अनेक गोष्टींचा त्याने खुलासाही केला आहे. राखी सावंतला त्रास दिल्यामुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आदिलला धमकावल्याची चर्चा होती. याबाबत आदिलने भाष्य केलं.
आदिल म्हणाला, “राखी सावंतबरोबर चुकीचं वागल्यामुळे सलमान खानने मला धमकवल्याचं वृत्त होतं. पण, हे सत्य नाही. मी त्याला एकदाही भेटलेलो नाही.” राखीपेक्षा १९ वर्षांनी लहान असल्याचा खुलासाही आदिलने यावेळी केला. राखीने आदिलवर मारहाण केल्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. आदिलने असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्ट केलं. याउलट राखीनेच त्याला मारहाण केल्याचं तो म्हणाला.
दरम्यान, राखी आणि आदिलने मे २०२२मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नानंतर सात महिन्यांनी राखीने आदिलबरोबर विवाह केल्याचा खुलासा केला होता. कोर्ट मॅरेजनंतर निकाह केल्याचंही राखीने सांगितलं होतं. आदिलबरोबर लग्न केल्यानंतर राखीने नावात बदल करून फातिमा असं केलं होतं. नमाज पठण करतानाचे अनेक व्हिडिओही राखीने शेअर केले होते. त्यानंतर राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार केली होती.