इंडस्ट्रीमधील रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आदित्य चोप्रांकडून 'साथी कार्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 01:05 PM2021-09-11T13:05:47+5:302021-09-11T13:06:45+5:30
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर या उद्योगक्षेत्राला सावरण्यासाठी आदित्य चोप्राने साथी कार्ड लॉन्च केले आहे.
यश राज फिल्म्स नेहमीच हिंदी सिनेसृष्टीतील रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी अग्रेसर राहिली आहे. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर या उद्योगक्षेत्राला सावरण्यासाठी आदित्य चोप्राने साथी कार्ड लॉन्च केले आहे. द यश चोप्रा फाउंडेशन अंतर्गत युनिव्हर्सल बेसिक सपोर्ट या आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्राप्त मॉडेलवर हे कार्ड आधारित असून त्या माध्यमातून इंडस्ट्रीमधील रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा, शालेय शुल्क, शिधा पुरवठा, वार्षिक आरोग्य तपासणी अशा स्वरूपाचे लाभ उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील हिंदी फिल्म फेडरेशनचा कोणताही नोंदणीकृत सदस्य, ३५ वर्षे आणि त्यावरील व्यक्ती, ज्याच्यावर किमान एक व्यक्ती अवलंबून आहे, अशा सदस्यांना www.yashchoprafoundation.org वर साथी कार्डकरिता अर्ज दाखल करता येईल. कार्डधारकाला आरोग्य देखभालीकरिता २ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा, मोफत वार्षिक तपासणी आणि वैद्यकीय बिल तसेच उपचार सेवांवर सूट मिळेल. नोंदणीकृत व्यक्तिला या कार्डाचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी देखील करता येईल. कारण व्हायआरएफ’च्या वतीने शालेय शुल्क, वह्या-पुस्तके आणि गणवेशाचा खर्च देण्यात येणार आहे. या कार्डचा उपयोग करून शिधा साहित्याची खरेदीही करता येईल.
जीवघेण्या कोरोना विषाणू महासाथीने मागील वर्षभरापासून मनोरंजन उद्योगाला संकटात टाकले. रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींवर या महासाथीचा विपरीत परिणाम झाला. अलीकडे भारताचे सर्वात मोठे प्रोडक्शन हाऊस, यश राज फिल्म्सने ‘यश चोप्रा साथी उपक्रम’ सुरू केला, ज्याद्वारे महासाथीचा फटका बसलेल्या इंडस्ट्रीमधील हजारो कामगारांना किमान मुलभूत साह्य उपलब्ध झाले आहे. तसेच उद्योगक्षेत्रामधील महिला आणि वरिष्ठ नागरिकांना रु. ५००० चा थेट लाभ, त्याचप्रमाणे काही विशिष्ट कालावधीकरिता ४ व्यक्तींच्या कुटुंबासाठी शिधा साहित्य संचाचे वितरण करण्यात आले.
ज्या कामगारांनी मुंबईत हिंदी सिनेसृष्टीला पुन्हा सुरू करण्यासाठी हातभार लावले, अशा हजारो कामगारांचे लसीकरण करण्याची योजना आदित्य चोप्रा याने सुरू केली आहे. मागील वर्षी टाळेबंदीत, आदित्य चोप्रा याने सिने उद्योगातील हजारो रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करून त्यांना साह्य केले होते.
व्हायआरएफ’चे वरिष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी म्हणाले की, “यश राज फिल्म्समध्ये आमचा विश्वास आहे की, केवळ उत्स्फूर्तपणे दान नव्हे तर आमच्या लाभधारकांच्या जीवनावर अधिक शाश्वत परिणाम निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठी धोरणात्मक विचार प्रक्रिया आणि कृती योजना राबण्याकडे कल असणार आहे. साथी कार्ड एखाद्या मित्रवत आधाराचे काम करून आमच्या इंडस्ट्रीच्या आधारस्तंभांना साह्य उपलब्ध करणारे असेल. आगामी काळात, आमच्या समुदायाचा भाग असणाऱ्या घटकांचे जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने विस्तार करण्याचा आमचा मानस राहील.”