कपूर खानदानातला 'हा' व्यक्ती अभिनेता म्हणून 'सुपरफ्लॉप' पण बिझनेसमन म्हणून 'सुपरहिट'!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:22 PM2024-07-01T14:22:28+5:302024-07-01T14:24:33+5:30
कपूर कुटुंबातला एक असा व्यक्ती जो अभिनेता म्हणून फ्लॉप ठरला. पण पुढे एक व्यावसायिक म्हणून त्याने करोडोंची उलाढाल केली
बॉलिवूडमधलं सर्वात मोठं अन् यशस्वी कुटुंब म्हणजे कपूर. कपूर खानदानातल्या पुरुष आणि महिला सर्वच जण अभिनय क्षेत्रात यशस्वी आहेत. गेली ४ पिढ्या कपूर खानदानातले कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पण कपूर खानदानातला असाही एक व्यक्ती आहे ज्याच्यावर फ्लॉप अभिनेत्याचा शिक्का बसला. परंतु पुढे अभिनयाची वाट सोडून त्याने व्यवसायाची वाट धरली. पुढे यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याने ओळख मिळवली. त्याचं नाव आदित्य राज कपूर.
सिनेमात नशीब आजमावलं पण अयशस्वी कारकीर्द
आदित्य यांनी वडील शम्मी कपूर आणि काका राज कपूर - शशी कपूर यांच्यासारखे अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहिले होते. ते लहानपणापासूनच मनोरंजन विश्वात काम करु लागले. आई गीता बाली यांच्या 'जबसे तुम्हे देखा है' या सिनेमात ते पहिल्यांदा बालकलाकाराच्या भूमिकेत झळकले. पुढे आदित्य यांनी फिल्म मेकिंग शिकण्यासाठी राज कपूर यांच्या 'बॉबी' सिनेमात सहाय्यक म्हणून काम केले होते.
'सत्यम शिवम सुंदरम', 'साजन', 'गिरफ्तार', 'पापी गुडिया', 'आरजू' यांसारख्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनृ त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून 'डोन्ट स्टॉप ड्रीमिंग', 'सांबार सालसा' असे दोन सिनेमे केले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. त्यांनी आशुतोष गोवारीकरांच्या एव्हरेस्ट मालिकेत अभिनय केला. परंतु त्यांचा हा प्रोजेक्टही फ्लॉप झाला.
सिनेमांमध्ये भ्रमनिरास पण यशस्वी व्यावसायिक
आदित्य यांनी पुढे व्यवसायात लक्ष दिलं. त्यांनी ट्रक आणि गोदामांचा व्यवसाय केला. हा व्यवसाय पुढे इतका यशस्वी झाला की त्याची उलाढाल आज कोट्यवधींची आहे. आता त्यांनी व्यवसायातूही ब्रेक घेतला असून ते आता पूर्णवेळ बाइकर बनले आहेत. आदित्य राज कपूर यांनी मनोरंजन विश्वात सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे चित्रपटांपासून दूर राहणेच पसंत केलं.
आदित्य सध्या त्यांची पत्नी प्रीती कपूर आणि दोन मुले तुलसी कपूर आणि विश्व प्रताप कपूर यांच्यासोबत गोव्यात राहतात. विशेष गोष्ट म्हणजे, आदित्य यांनी २०२३ मध्ये वयाच्या ६७ व्या वर्षी फिलोसॉफी विषयात ५९ % गुण मिळवून डिग्री मिळवली. अशाप्रकारे मनोरंजन विश्वात फ्लॉप झाले असले तरीही बिझनेसमन म्हणून त्यांनी स्वतःची ओळख मिळवली.