अभिनयानंतर आता सूत्रसंचालनात मनोज वाजपेयीने टाकले पाऊल, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 07:21 PM2021-02-11T19:21:20+5:302021-02-11T19:21:46+5:30
अभिनेता मनोज वाजपेयीने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र आता तो एका वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. डिस्कवरी अॅप आणि चॅनलवरील ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी’ या डॉक्युमेंट्रीमध्ये तो निवेदन करताना दिसणार आहे. प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक नीरज पांडे आणि फ्रायडे स्टोरीटेलर्स त्यांची ही आजवरची पहिलीच डॉक्युमेंटरी सादर करत आहेत
मनोज वाजपेयीने आपल्या या नव्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले की, मला बेयर ग्रिल्सचे निवेदन खूपच आवडते. मात्र, मी त्यांच्यासारखे पराक्रम करू शकत नाही. मला उंचावरून खाली पाहण्यासही भीती वाटते. पण निवेदनसुद्धा एक चांगले काम आहे. सोबतच इथे आम्ही ४ हजार वर्षापूर्वीच्या गोष्टींबद्दल सांगत आहोत. मला इतिहासाची खूप आवड आहे. तसेच माझे पदवीचे शिक्षणसुद्धा इतिहासातच झाले. तसेच ही डॉक्युमेंट्री नीरज पांडे काढत होते त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. ही डॉक्युमेंट्री खूपच मस्त आहे. तसेच ती अनेक तथ्यांचा खुलासाही करते.
मनोज वाजपेयीने सांगितले की, “सिक्रेटस ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी हा माझ्यासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व खूप काही शिकवणारा अनुभव ठरला आहे आणि त्याबद्दल मी डिस्कव्हरी+ आणि नीरज पांडेच्या फ्रायडे स्टोरीटेलर्सला अतिशय धन्यवाद देतो. ह्या डॉक्युमेंटरीमध्ये विशेष उल्लेखनीय प्राचीन रथ व उत्खननामध्ये समोर आलेल्या विविध वस्तु ह्यांच्या शोधासंदर्भात ऐतिहासिक बाबी समोर आणल्या जात आहेत व त्याद्वारे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण कालखंडावर प्रकाश टाकला जात आहे.”
यावेळी आपल्या ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसीरीजबाबत बोलताना मनोज यांनी सांगितले की, ही वेबसीरीज सध्या तरी प्रदर्शित होणार नाही. यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.