कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर आता तिच्या खारमधील फ्लॅटवर BMCचा डोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 06:57 PM2020-09-09T18:57:46+5:302020-09-09T18:59:36+5:30
कंगनाच्या कार्यालयावरील महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई तुर्तास थांबवली आहे. मात्र आता मुंबई महापालिकेचे पुढील लक्ष्य कंगनाचे खारमधील राहते घर आहे.
शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. दरम्यान कंगनाच्या कार्यालयावरील महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई तुर्तास थांबवली आहे. मात्र आता मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रानौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे.
मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती.
जाणून घ्या, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगना राणौतच्या ऑफिसमधले नक्की काय- काय तोडलं
मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.
कंगनाला उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा, कारवाईला स्थगिती
कंगनाच्या राहत्या फ्लॅटमधील अनधिकृत बांधकामावरही पालिका करु शकते कारवाई
गेल्या दोन वर्षात पालिकेने काहीच म्हणणे न्यायालयात मांडले नव्हते, मात्र आता कंगनाला धारेवर धरण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कोर्टात पालिकेने आपले म्हणणे मांडले आहे. तसेच या प्रकरणी दिलेली स्थगिती मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. कोर्टानं स्टे उठवल्यास ऑफिसपाठोपाठ कंगनाच्या राहत्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करु शकते.
कंगना व शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला
कंगना राणौत व शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने केलेल्या कारवाईनंतर कंगनाचा संताप अनावर झाला असून 12 सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत तिने जोरदार टीका केली आहे.