सुश्मितासाठी वेडा झाला होता ‘हा’ दिग्दर्शक, ब्रेकअपनंतर अगदी आत्महत्या करणार होता...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 02:17 PM2021-12-24T14:17:54+5:302021-12-24T14:20:00+5:30
Actress Sushmita Sen Love Affair : सुश्मितासोबतचं अफेअर माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठी चूक होती, हेही त्यानं मान्य केलं होतं. त्या चुकीचा आजही त्याला पश्चाताप होतो.
सुश्मिता सेनचं (Sushmita Sen) नुकतंच बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झालं. ब्रेकअपची बातमी खुद्द सुशने कन्फर्म केली. अर्थात हे पहिल्यांदा घडलं नव्हतंच. याआधीही सुश्मिताच्या आयुष्यात अनेक पुरूष आलेत आणि आले तसे निघून गेलेत. यातली सुश्मिताची एक लव्हस्टोरी मात्र प्रचंड गाजली होती. अगदी आजही या लव्हस्टोरीची चर्चा होते. ( Actress Sushmita Sen Love Affair)
होय, सुश्मिता तेव्हा जेमतेम 20 वर्षांची होती आणि एका दिग्दर्शकाच्या प्रेमात होती. ‘दस्तक’ या सिनेमाच्या सेटवर तिची व त्या दिग्दर्शकाची भेट झाली होती. त्या दिग्दर्शकाचं तर विचारू नका. तो तिच्यासाठी अक्षरश: वेडा झाला होता. इतका की, तिच्यासाठी त्यानं आपल्या बायकोलाही सोडलं होतं. हे नातं काही वर्ष चाललं. पण अचानक बिनसलं आणि तुटलं. या ब्रेकअपनंतर तो दिग्दर्शक इतका सैरभैर झाला होता की, घरावरून उडी मारून आत्महत्या करणार होता. तो प्रसंग अर्थात टळला. पण सुश्मितासाठी आपण आपल्या बायकोला सोडलं, हा पश्चाताप त्याला आजही होतो. हा दिग्दर्शक कोण तर विक्रम भट (Vikram Bhatt) .
होय, एक काळ असा होता जेव्हा विक्रम भट सुश्मिताच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला होता. विवाहित असूनही विक्रम सुश्मितात गुंतला होता. सुश्मितासाठी त्यानं घरदार सोडलं. अगदी पत्नीला घटस्फोटही दिला. पण पुढे एका मुलाखतीत तो पश्चातापाचे अश्रू ढाळताना दिसला होता.
होय, एका मुलाखतीदरम्यान विक्रम भटने सुश्मिता व त्याच्या नात्यावर भाष्य केलं होतं. ‘सुश्मितासोबतच्या अफेअरमुळे मी माझी लहानपणीची मैत्रिण आणि पत्नी अदितीला घटस्फोट दिला. प्रत्यक्षात मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हतो. परंतु परिस्थिती तशी उद्भवल्यामुळे मला हे कठोर पाऊल उचलावं लागलं. पण पत्नी आयुष्यात गेली आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो. कारण मी माझं आयुष्य स्वत:च्या हातांनी उद्धवस्त केलं होतं. मी माझ्या मुलीला वेड्यासारखे मिस करत होतो. माझी पत्नी मला सोडून निघून गेली तेव्हा मी घराच्या बाल्कनीमधून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे मी पत्नीशी चांगले संबंध निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यात मी अपयशी ठरलो,’ असं तो म्हणाला होता.
सुश्मितासोबतचं अफेअर माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठी चूक होती, हेही त्यानं मान्य केलं होतं. त्या चुकीचा आजही त्याला पश्चाताप होतो.