‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा
By रूपाली मुधोळकर | Published: October 14, 2020 10:20 AM2020-10-14T10:20:20+5:302020-10-14T10:21:17+5:30
मुद्दा कुठलाही असो कंगना त्यावर बोलते. तिचे ट्विट अनेकदा वाद ओढवून घेतात. सध्या अशाच एका ट्विटमुळे कंगना गोत्यात आली आहे.
कंगना राणौत आणि वादाचे जवळचे नाते आहे. मुद्दा कुठलाही असो कंगना त्यावर बोलते. तिचे ट्विट अनेकदा वाद ओढवून घेतात. सध्या अशाच एका ट्विटमुळे कंगना गोत्यात आली आहे. तिच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाआहे.
21 सप्टेंबरला कंगनाने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कंगनाने कृषी विधेयकाचा विरोध करणा-या शेतक-यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. याच वादग्रस्त ट्विटप्रकरणी कर्नाटकच्या तुमकुरूच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तुमकूर जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला गेला.
कंगनावर आयपीसी कलम 108, 153अ आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ‘थलायवी’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.
FIR registered against Bollywood actor Kangana Ranaut in Karnataka's Tumakuru district over a tweet allegedly targeting farmers protesting against the recently enacted central farm laws: Police
— Press Trust of India (@PTI_News) October 13, 2020
काय आहे प्रकरण
केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर पंजाबमध्ये शेतक-यांनी तीव्र आंदोलनास सुरुवात केली होती. त्यानंतर कृषीविषयक विधेयकांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणा-या शेतक-यांविरोधात कंगनाने ट्विट केले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे एकाचेही नागरिकत्व गेलेले नसताना याच दहशतवाद्यांनी त्या कायद्याविरोधात हिंसाचार माजविला होता, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. ‘मोदीजी, कोणी झोपले असेल तर त्याला जागे केले जाऊ शकेल, पण झोपेचे सोंग घेणा-यांना कोण जागे करेन. अशा लोकांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार. हे तेच दहशतवादी आहेत़, ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएएमुळे एकाही व्यक्तिचे नागरिकत्व गेले नाही, मात्र त्यांनी सीएएविरूद् आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते,’ असे ट्विट कंगनाने केले होते तिच्या या ट्विटवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. आता कंगना शेतक-यांना दहशतवादी म्हणतेय. मोदी सरकारने दिलेली सुरक्षा व पाठींबामुळे भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली आहे, असे सचिन सावंत म्हणाले होते.
सिद्ध कराच...
कंगनाने शेतक-यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप होताच कंगना चवताळली होती.
‘जैसे श्री कृष्ण की नारायणी सेना थी, वैसे ही पप्पु की भी अपनी एक चंपू सेना है जो की सिर्फ़ अफवाहों के दम पे लड़ना जानती है, यह है मेरा अरिजिनल ट्वीट अगर कोई यह सिद्ध करदे की मैंने किसानों को आतंकी कहा, मैं माफी माँगकर हमेशा केलिए ट्वीटर छोड़ दूँगी ’, असे थेट आव्हान तिने दिले होते.