'दृश्यम २'नंतर अजय देवगणचा 'सिंघम अगेन', सिनेमाची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 20:10 IST2022-12-06T20:09:55+5:302022-12-06T20:10:25+5:30
Ajay devgn: सर्वसामान्य गृहस्थाच्या रूपातही बॉक्स ऑफिसवर १६० कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यशस्वी झालेला अजय देवगण पुन्हा 'सिंघम'गिरी करताना दिसणार आहे.

'दृश्यम २'नंतर अजय देवगणचा 'सिंघम अगेन', सिनेमाची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
सर्वसामान्य गृहस्थाच्या रूपातही बॉक्स ऑफिसवर १६० कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यशस्वी झालेला अजय देवगण (Ajay Devgn) पुन्हा 'सिंघम'गिरी करताना दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या दिवसापासून अजयचा 'दृश्यम २' (Drishyam 2) चांगली गर्दी खेचत आहे. 'सिंघम' आणि 'दृश्यम २' या दोन्ही चित्रपटांमध्ये परस्पर भिन्न व्यक्तिरेखा साकारूनही प्रेक्षकांनी दोन्ही स्वीकारत अजयचं कौतुक केलं आहे. 'दृश्यम'मध्ये सर्वसामान्य बनून पोलिसांचा मार खाणारा अजय पुन्हा एकदा पोलिसांची खाकी परिधान करून गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनल्याचं दिसणार आहे.
'सिंघम'चा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स'च्या यशानंतर 'सिंघम अगेन' या चित्रपटात पुन्हा जुनाच अजय भेटणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावर पुन्हा अजयच्या 'सिंघम'गिरीची चर्चा रंगू लागली आहे. 'भोला' चित्रपटातून मोकळा झाल्यावर अजय 'सिंघम अगेन'च्या शूटिंगसाठी वेळ देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
'दृश्यम २'ची छप्परफाड कमाई
अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम २' बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करतोय. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 'दृश्यम २' ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि दोन आठवड्यांनंतरही 'दृश्यम २' चा फिव्हर कायम आहे. तिसऱ्या शुक्रवारीही या चित्रपटाने ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.