'द कश्मीर फाइल्स'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येक सीननंतर चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 11:54 AM2022-03-18T11:54:04+5:302022-03-18T11:54:35+5:30
‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटात चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar)ने दहशतवादी बिट्टा कराटे ही भूमिका साकारली आहे.
सध्या सर्वत्र द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)ने दहशतवादी बिट्टा कराटेची भूमिका साकारली आहे. काश्मिरी पंडितांना बेघर करणारा आणि अमानुषपणे त्यांची हत्या करणारा हा बिट्टा कराटेची भूमिका चिन्मयने उत्तमरित्या साकारली आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा इंटरेस्टिंग किस्सा सांगितला आहे.
द कश्मीर फाइल्सच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना चिन्मय मांडलेकर म्हणाला की, द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचे चित्रीकरण मसुरीमध्ये सुरु होते. त्यावेळी मॉब सीनसाठी तिथल्या काही स्थानिक लोकांना बोलावले होते. त्यावेळी सेटवरील भारतविरोधी घोषणा लोकांनी पाहिल्या. यानंतर जेव्हा चिन्मयने त्याच्या बिट्टा कराटे या पात्राचे भाषण केले, तेव्हा मॉबमधील लोकांनी आम्ही यात काम करणार नाही आणि काम सुरु राहू देणार नाही, यात देशाविरोधात बोलले जात आहे, असे म्हणत शूटिंग थांबवायला लावले.
त्याने पुढे सांगितले की, मसुरीत आधीच एक गाडी जाऊ शकेल एवढाच रस्ता, त्यातही या शूटिंगसाठी तब्बल दीड तास हे ट्राफिक थांबवून सीन सुरु होता. शेवटी चिन्मयला पुढाकार घ्यावा लागला आणि त्याने त्या लोकांशी संवाद साधला. त्यांना समजावून सांगितले की, हे केवळ चित्रपटाचे शूटिंग आहे. त्याने शेवटी त्याच्या मराठीतील भूमिका दाखवल्या. आपण मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारात असल्याचे देखील सांगितले. तेव्हा लोक शांत झाले.
लोकांनी घातली ही अट...
त्या लोकांनी चिन्मयला एक अट घातली. प्रत्येक सीननंतर आम्ही इथे भारत माता की जय ही घोषणा देणार. त्यांची ही मागणी मान्य केली आणि चिन्मय देखील त्यांच्यात सामील झाला. प्रत्येक सीननंतर थांबून तो स्वतः देखील ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार’, ‘जो बोले सो निहाल’ अशा घोषणा देत होता. अर्थात तिथल्या लोकांचे देशावरील प्रेम या निमित्ताने अनुभवायला मिळाल्याचे चिन्मय मांडलेकरने सांगितले.