Allu Arjun : मानलं भावा! अल्लू अर्जुनने नाकारली कोट्यवधीची दारूची ‘सरोगेट’ जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:26 AM2022-08-12T10:26:42+5:302022-08-12T10:27:03+5:30
Allu Arjun : होय, ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनने एक कोट्यवधी रूपयांची दारूची जाहिरात नाकारली आहे. याआधी अल्लूने तंबाखूची जाहिरातही नाकारली होती.
Pushpa Fame Allu Arjun Rejects Whisky Brand Surrogate Advertising : तुम्हाला ठाऊक असेलच की, साऊथची सुपरस्टार साई पल्लवी हिने काही वर्षांआधी 2 कोटी रूपयांची फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारली होती. यासाठी तिचं प्रचंड कौतुक झालं होतं. अगदी आजही यासाठी चाहते तिला शाब्बासकी देतात. आता साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) यानेही असंच काही केलं आहे. होय, ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनने एक कोट्यवधी रूपयांची दारूची जाहिरात नाकारली आहे.
होय, चर्चा खरी मानाल तर, एका मोठ्या मद्य उत्पादक कंपनीने अल्लूला आपल्या जाहिरातीची ऑफर दिली होती. यासाठी 10 कोटी रूपये मोजायला ही कंपनी तयार होती. पण अल्लू क्षणाचाही विचार न करता ही ऑफर धुडकावून लावली. याआधी अल्लूने तंबाखूची जाहिरातही नाकारली होती.
रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने ज्या कंपनीची जाहिरात धुडकावून लावली, त्या मद्याच्या बँडशी अनेक सेलिब्रिटी जुळलेले आहेत. सामंथा प्रभुपासून प्रियंका चोप्रा, आलिया भट असे अनेक सुपरस्टार या बड्या विस्की बँडच्या सरोगेट जाहिरात मोहिमेशी जुळलेले आहेत. हे सेलिब्रिटी या ब्रँडच्या पाण्याची व ग्लासची जाहिरात करतात. अल्लू अर्जुनला मात्र सरोगेट जाहिरात नकोय. सरोगेट जाहिराती सुद्धा मद्य विक्रीस प्रोत्साहन देतात, असं त्याचं मत आहे. मुळात भारतात तंबाखू, गुटखा, दारू अशा उत्पादनांच्या जाहिराती करता येत नाहीत. पण त्यासाठी एका पळवाटेचा, अर्थात सरोगेट अडव्हर्टायझिंगचा वापर केला जातो.
अल्लू अजुर्नने कोट्यवधी रूपयांची मद्याची जाहिरात नाकारून एक नवा आदर्श घालून दिला आहे. यासाठी सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होत आहे. अल्लू रिअल सुपरस्टार आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
अल्लूच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. या चित्रपटाच्या बंपर यशानंतर अर्जुनची डिमांड वाढली आहे. त्याला एका पाठोपाठ एक ब्रँड एंडोर्समेंट मिळत आहेत. मोठ मोठे ब्रँड त्याला म्हणेल ती रक्कम द्यायला तयार आहेत. पण आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या उत्पादनांच्या जाहिराती करणार नाही, हे अल्लू अर्जुनने ठरवून टाकलं आहे.