Real Hero! मजूरांच्या मदतीनंतर आता केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:39 PM2020-05-29T12:39:32+5:302020-05-29T12:40:07+5:30
केरळमध्ये शिवणकाम व एम्ब्रॉडरीचे काम करणाऱ्या 177 मुली अडकल्याचे समजल्यावर सोनू सूदने त्यांना घरी सुखरुप पोहचवण्याचे ठरविले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद सातत्याने चर्चेत येत आहे. मुंबईतील प्रवासी मजूरांसाठी देवदूत बनला आहे. मुंबईतील प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी सुखरूप घरी पोहचवण्याचे शिवधनुष्य सोनू सूदने पेलले आहे. त्यासाठी सर्वत्र त्याचं कौतूक होत आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीनंतर आता त्याने अशक्य अशी गोष्ट करत आहे, जी समजल्यावर तुम्ही त्याचे कौतूक कराल.
केरळमधील एर्नाकुलम येथे अडकलेल्या 177 मुलींना स्पेशल विमानाने त्यांच्या घरी सोनू सूद पोहचवणार आहे. त्या मुली केरळमधील एका फॅक्टरीमध्ये शिवणकाम व एम्ब्रॉडरीचे काम करतात. कोरोनामुळे ही फॅक्टरी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र त्या मुली तिथेच अडकल्या होत्या.
सोनू सूदच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनूला त्याच्या भुवनेश्वरमधील जवळच्या मित्राकडून केरळमध्ये अडकलेल्या मुलींबद्दल समजले. त्या मुली भुवनेश्वरमधील आहेत. त्या कामाच्या निमित्ताने केरळमध्ये राहतात. त्यानंतर सोनूने त्यांना मदत करायचे ठरविले.
त्यासाठी त्याने कोची आणि भुवनेश्वर येथील सरकारकडून परवानगी घेतली. बंगळूरूमधून त्याने विमानाची सोय केली आहे आणि कोचीमधून 177 मुलींना भुवनेश्वर येथे सोडणार आहे. तिथून पुढे त्यांचे गाव दोन तासांवर आहे आणि अशारितीने ते त्यांच्या घरी सुखरूप पोहचतील.