SHOCKING! सलमाननंतर बॉलिवूडचा ‘हा’ सेलिब्रिटी होता लॉरेन्स बिश्नोई गँगचं पुढचं टार्गेट?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:58 AM2022-06-19T11:58:10+5:302022-06-19T11:59:00+5:30
Bishnoi Gang: बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानला गेल्या 5 जूनला जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळालं होतं. तुझा सिद्धू मुसेवाला करू, असं या पत्रात लिहिलं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय.
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानला ( Salman Khan) गेल्या 5 जूनला जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळालं होतं. तुझा सिद्धू मुसेवाला करू, असं या पत्रात लिहिलं होतं. कथितरित्या लॉरेन्स बिश्नोई गँगनं हे धमकीचं पत्र पाठवल्याचं मानलं गेलं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. सलमान खाननंतर बॉलिवूडचा आणखी एक सेलिब्रिटी बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi gang) हिटलिस्टवर असल्याची, शॉकिंग माहिती समोर आली आहे.
कथितरित्या बिश्नोई गँगच्या टार्गेट लिस्टमध्ये बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर ( Karan Johar) याचं नाव असल्याचा खुलासा झाला आहे. बिश्नोई गँगचा सदस्य सिद्धेश कांबल उर्फ महाकालने पोलिस चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे.
महाकाल हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित शूटर संतोष जाधव याचा जवळचा सहकारी आहे. महाकालला मुसेवालाच्या हत्येच्या कटाची चांगली माहिती होती. तो सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून. दिल्ली पोलिस, पंजाब पोलिस, मुंबई क्राइम बँचने त्याची चौकशी केली.
पोलिस चौकशीदरम्यान महाकालने मुसेवाला हत्येच्या कटाबद्दल बरीच माहिती दिली आहे. बिश्नोई गँगच्या अन्य कटकारस्थानांचीही त्याने माहिती दिली. बिश्नोई गँगने करण जोहरला धमकावून त्याच्याकडून 5 कोटी रूपयांची खंडणी उकळण्याची योजना आखली होती, असं एका पोलिस अधिकाºयानं सांगितलं.
कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारचा भाऊ विक्रम ब्रार याने आपल्याशी इन्स्टाग्राम व सिग्नल अॅप्सवर या प्लानबद्दल चर्चा केली होती, असंही महाकालने सांगितल्याचं संबंधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. अर्थात अद्याप महाकालच्या या दाव्याची अद्याप पडताळणी झाली नसल्याचंही या पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. प्रसिद्धी मिळवणं शिवाय स्वत:चा दबदबा निर्माण करण्याचा हेतू यामागे असू शकतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे. हाय प्रोफाइल प्रकरणांशी वा व्यक्तिंशी आपली नावं जोडणं हा गुडांचा जुना फंडा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पंजाबी सिंगर सिद्ध मुसेवालाच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं. याच लॉरेन्स बिश्नोईनं 2018 साली सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं प्रकरण ताज असतानाच सलमान खान यालाही जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र प्राप्त झालं होतं.