'गदर २'च्या सक्सेसनंतर सनी देओलचा भाव वधारला, घेतोय इतके कोटी, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:05 PM2023-09-05T12:05:29+5:302023-09-05T12:06:08+5:30
Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या गदर २चा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत आहे. या चित्रपटाने ४५० कोटींहून जास्त कमाई केली आहे. अभिनेत्याने मानधन वाढवल्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
गदर २(Gadar 2)मधून पुन्हा एकदा तारा सिंग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच अभिनेत्याच्या करिअरमधला सर्वात सुपरहिट सिनेमा म्हणून नोंद करण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओल(Sunny Deol)सोबत अमिषा पटेल (Amisha Patel) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. सनी देओल सध्या गदर २चा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत आहे. या चित्रपटाने ४५० कोटींहून जास्त कमाई केली आहे. अभिनेत्याने मानधन वाढवल्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
गदर २ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींचा आकडा पार करत सुपरहिट ठरला आहे. सध्या सर्वत्र गदर २ची चर्चा रंगली आहे. प्रदर्शित झाल्यानंतरही दोन आठवडे थिएटर हाउसफुल आहे. गदरला मिळालेल्या यशानंतर सनी देओलच्या पुढील चित्रपटाबाबत चाहत्यांना खूप आशा आहे. दरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे की, गदर २च्या यशानंतर सनी देओलने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.
मानधनात वाढ केल्याच्या चर्चांवर सनी देओल म्हणाला...
गदर २नंतर सनी देओलने त्याचे मानधन वाढवून ५० कोटी केले असून आता तो सलमान आणि शाहरुख खानच्या लीगमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान आता या वृत्तावर अभिनेत्याने मौन सोडले आहे. तो म्हणाला की, पैशांची बाब खासगी आहे आणि किती मानधन घेणार हे तेव्हा ठरेल जेव्हा तो पुढील सिनेमा साइन करेल. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सर्वात आधी मला वाटतं की, पैशांची बाब खूप खासगी आहे. कोणताही व्यक्ती जो कमावतो आहे, तो त्याबद्दल कुठेच बोलत नाही. इतकेच नाही तर जवळच्या व्यक्तींसोबतही नाही. मी जे पैसे घेतो किंवा नाही घेत याचा निर्णय तेव्हा घेतला जाणार जेव्हा मी माझा पुढील सिनेमा साइन करेन. सध्या आम्ही सगळे गदर २च्या यशाच्या प्रक्रियेत आहोत.