'हा' बॉलिवूड अभिनेता-गायक चौथ्यांदा करणार लग्न? आधीच्या तीनही पत्नी परदेशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:17 IST2025-02-07T14:17:23+5:302025-02-07T14:17:54+5:30
बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणारा आणि गाण्यांनी प्रसिद्ध झालेला अभिनेत्याने चौथ्यांदा लग्न करणार असल्याची इच्छा बोलून दाखवलीय

'हा' बॉलिवूड अभिनेता-गायक चौथ्यांदा करणार लग्न? आधीच्या तीनही पत्नी परदेशी
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी दोन लग्न केली आहेत. किंवा असेही सेलिब्रिटी दिसतात जे पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतात. पुढे गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशीपमध्ये राहतात. बॉलिवूडमध्ये अभिनय आणि त्याच्या गाण्यांनी प्रसिद्ध झालेला अभिनेता एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. 'ओ सनम' (o sanam) या गाण्यातून चाहत्यांचं मन जिंकणारा अभिनेता-गायक लकी अलीने ही इच्छा व्यक्त केलीय. (lucky ali)
लकी अली चौथ्यांदा चढणार बोहल्यावर?
स्टोरीटेलर्स फेस्टिवलमध्ये लकी अलीला विचारण्यात आलं की, त्यांच्या जीवनाचा उद्देश काय आहे? त्यावर लकीने उत्तर दिलं की, "इथे येणं आणि जाणं हाच उद्देश असतो. त्याशिवाय आपल्याकडे कोणताही रस्ता नसतो. माझं स्वप्न आहे की, मी पुन्हा लग्न करावं." लकी अलीने हे विधान करताच तरीही गायक-अभिनेता खरंच चौथ्यांदा बोहल्यावर चढणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय. लकीची तीन लग्न झाली असून त्याने तीनही पत्नींशी घटस्फोट घेतलाय. यामुळे सध्या तो सिंगल आहे.
लकीने आजवर केलीत तीन लग्न
लकी अलीने त्याच्या आजवरच्या आयुष्यात तीन लग्न केली आहेत. १९६६ मध्ये ऑस्ट्रेलियाला राहणाऱ्या मेघन जेन मॅक्लेरीसोबत लकीने पहिलं लग्न केलं होतं. लकी आणि मेघन यांना दोन मुलंही आहेत. त्यानंतर २००० साली लकीने पर्शियाला राहणाऱ्या इनायासोबत लग्न केलं. इनाया आणि लकीलाही दोन मुलं आहेत. २०१० साली लकीने ब्रिटीश मॉडेल केट एलिझाबेथ हॉलमसोबत तिसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. पण २०१७ साली केट आणि लकीने घटस्फोट घेतला.