सलमानचा 'सिंकदर' येतोय, विकी कौशलची जादू ओसरली? 'छावा'नं किती रेकॉर्ड मोडलेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:54 IST2025-03-26T11:53:56+5:302025-03-26T11:54:08+5:30
'छावा'नं बॉलिवूड चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे.

सलमानचा 'सिंकदर' येतोय, विकी कौशलची जादू ओसरली? 'छावा'नं किती रेकॉर्ड मोडलेत?
नव्या वर्षात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवला आहे. विकीचा 'छावा' हा चित्रपट २०२५ मधील सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा' (Chhaava) चित्रपटानं सातव्या आठवड्यातही वर्चस्व कायम ठेवलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट दररोज कोट्यवधींची कमाई करत आहे. सुलतान, पीके, गदर २, संजू, पद्मावत, टायगर जिंदा है यांसारखे चित्रपट मागे टाकल्यानंतर छावाच्या निशाण्यावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा 'जवान' चित्रपट आहे.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला 'छावा' बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर ठामपणे विराजमान आहे. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि आशुतोष राणा स्टारर चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण निव्वळ कलेक्शन जवळपास ६०० कोटींवर गेलं आहे. पण, 'छावा' पुढचा रस्ता खडतर दिसतोय. कारण, सलमान 'सिकंदर' ३० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा फटका 'छावा' ला बसणार असल्याचं दिसतंय. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका आहे.
विशेष म्हणजे 'छावा'ची जादू संसदेपर्यंत पोहोचली आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन संसदेकडून करण्यात आलं आहे. या स्क्रिनिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या लायब्ररी इमारतीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये विकी कौशलचा हा चित्रपटा दाखवला जातोय. दरम्यान, 'छावा' आता पुढील महिन्यात ११ एप्रिल २०२५ मध्ये स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या ओटीटी रीलीजच्या प्रतिक्षेत आहेत. अनेकांनी सिनेमा चित्रपटगृहात पाहिला आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.