दीपिका पादुकोण नाही तर ऐश्वर्या राय होती 'पद्मावत'साठी पहिली पसंती, या कारणामुळे तिने नाकारला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:06 IST2025-01-25T17:05:18+5:302025-01-25T17:06:26+5:30
Padmavat Movie : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट पद्मावत पुन्हा एकदा चित्रपटगृहात परतणार आहे.

दीपिका पादुकोण नाही तर ऐश्वर्या राय होती 'पद्मावत'साठी पहिली पसंती, या कारणामुळे तिने नाकारला सिनेमा
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा सुपरहिट चित्रपट 'पद्मावत' (Padmavat Movie) पुन्हा एकदा चित्रपटगृहात परतणार आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भरघोस कमाईबरोबरच कलाकारांनीही सिनेमातील पात्रातून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ला खूप पसंती मिळाली होती. तर रणवीर सिंग (Ranveer Singh) सुलतान अलाउद्दीन खिलजीच्या नकारात्मक भूमिकेत होता. या चित्रपटात शाहिद कपूरने महारावल रतन सिंगची भूमिका साकारली होती. आदिती राव हैदरी, अनुप्रिया गोएंका आणि रझा मुराद यांसारख्या अनेक कलाकारांनी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
खरेतर पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोण आणि खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. होय, भन्साळींच्या दोन आवडत्या कलाकारांनी या चित्रपटाला होकार दिला असता तर ही कास्टिंग पूर्णपणे वेगळी पाहायला मिळाली असती. पण त्या अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. कोण असेल ही अभिनेत्री आणि अभिनेता हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर आम्ही बोलत आहोत भन्साळींचे आवडते ऑन-स्क्रीन जोडपे म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनबद्दल. 'हम दिल दे चुके सनम' या सुपरहिट चित्रपटानंतर भन्साळींना सलमान आणि ऐश्वर्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायचे होते, परंतु त्यांच्या ब्रेकअपमुळे असे घडले नाही. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने घोषणा केली होती की ती सलमानसोबत कधीही स्क्रीन शेअर करणार नाही.
ऐश्वर्याने का नाकारला पद्मावत?
ऐश्वर्या रायने पद्मावतला होकार दिला, पण कास्टिंगवर ती खूश नव्हती. एकदा स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत पद्मावत नाकारल्याबद्दल अभिनेत्री म्हणाली होती की, त्यांची (संजय लीला भन्साळी) इच्छा होती की मी पद्मावतमध्ये काम करावे, पण कास्टिंगच्या वेळी ते माझ्यासाठी खिलजी आणू शकले नाही. त्यामुळेच ते होऊ शकले नाही. शेवटी तुम्हाला कास्टिंग पाहावे लागते. कास्टिंग होत नसेल, तर कधीकधी एकत्र काम करता येत नाही. एकत्र काम करण्याचा मानस नेहमीच होता, पण तसे झाले नाही. आम्हा दोघांनाही एकमेकांसोबत काम करायला आवडले असते. आता पाहूयात हे केव्हा घडते.
सलमानने ऐश्वर्याची अट केली नाही मान्य
असे म्हटले जाते की, ऐश्वर्या रायने सलमानसोबत काम करण्यास होकार दिला होता, मात्र तिची अट होती की, तिचा या चित्रपटात अभिनेत्यासोबत कोणताही सीन नसेल. जेव्हा सलमानला ही माहिती मिळाली तेव्हा त्याने ही अट मान्य केली नाही. कारण त्याला ऐश्वर्यासोबत स्क्रीन शेअर करायची होती. अखेर हा चित्रपट दोघांच्याही हातून निसटला. त्यानंतर भन्साळींनी दीपिका आणि रणवीरला कास्ट केले. सध्या चित्रपटगृहांमध्ये पद्मावत पुन्हा प्रदर्शित होत आहे. यापूर्वी हा चित्रपट २४ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, मात्र आता ६ फेब्रुवारीला तो मोठ्या पडद्यावर येणार आहे.