९०च्या दशकातल्या अभिनेत्रीसोबत संसार थाटणार होता अजय देवगण, काजोलची झाली एन्ट्री अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 09:29 AM2023-11-04T09:29:35+5:302023-11-04T09:29:49+5:30
Ajay Devgan And Kajol : अजय देवगण आणि काजोल लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, काजोलपूर्वी अजय नव्वदच्या दशकातील एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.
अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे आहेत. दोघांच्या लग्नाला २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अजय आणि काजोलने लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. त्यावेळी करिश्मा कपूरचेही जबरदस्त स्टारडम होते. असं म्हटलं जातं की काजोलच्या आधी अजय देवगण करिश्मा कपूरवर प्रेम करत होता आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच दरम्यान काजोलची एंट्री झाली आणि सगळे चित्र बदलून गेले.
९० च्या दशकात अजय देवगण, काजोल आणि करिश्मा कपूर यांची गणना मोठ्या स्टार्समध्ये होते. तिघांच्या प्रेम त्रिकोणाचीही खूप चर्चा झाली होती. 'जिगर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण आणि करिश्मा कपूर खूप जवळ आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरपूर्वी अजय देवगण रवीना टंडनला डेट करत होता.
काजोलने केला करिश्मा कपूरचा पत्ता कट!
'जिगर' नंतर अजय देवगण आणि करिश्मा कपूर 'सुहाग', 'धनवान' आणि 'सरगम'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. एकत्र चित्रपट करत असताना दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असत आणि खूप जवळ आले. पण याच दरम्यान अजय देवगणच्या आयुष्यात काजोलची एन्ट्री झाली. दोघांनी १९९५ साली 'हलचल' चित्रपटात काम केले होते. त्यावेळी काजोलला अजय देवगणचा स्वभाव आवडला आणि त्यानंतर दोघेही चांगले मित्र बनले.
त्यांच्या मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात
असे म्हटले जाते की त्या दिवसांत काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताला डेट करत होती, पण त्यांचे नाते तुटले. चांगले मित्र असल्याने काजोल आणि अजय देवगण अनेकदा त्यांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत. या काळात त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. रिपोर्ट्सनुसार, एकदा काजोल आणि अजय देवगण एकत्र बसले होते, तेव्हा करिश्मा कपूरने अजय देवगणला फोन केला. कॉलवर मुलीचा आवाज ऐकून काजोलला खूप राग आला. यानंतर अजय देवगणने काजोलवरील प्रेम स्वीकारले आणि त्यानंतर करिश्मा कपूर त्याच्या आयुष्यातून निघून गेली. अजय देवगण आणि काजोल यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केले. दोघांना दोन मुले असून त्यांची नावे न्यासा देवगण आणि युग देवगण आहेत.