अजय देवगण-काजोलनं विकत घेतला नवा अलिशान बंगला, किंमत वाचून चकित व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:39 AM2021-05-31T11:39:55+5:302021-05-31T11:41:11+5:30
Ajay Devgn and kajol second home : वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, बंगल्यात काही बदल केले जाणार असल्याचे कळतेय. लवकरच अजय या बंगल्यात राहायला येणार असल्याचेही मानले जात आहे.
देशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांचे आयुष्य रस्त्यावर आले. बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी मात्र याला अपवाद ठरलेत. आता काय तर अनेक बडे सेलिब्रिटी एकापाठोपाठ एक मुंबईत अलिशान प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. आलिया भट, हृतिक रोशन, जान्हवी कपूर यांच्यानंतर नुकताच अर्जुन कपूरने एक अलिशान स्कायव्हिला खरेदी केला. पाठोपाठ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी कोट्यवधी रूपयांचे डुप्लेक्स खरेदी केले. आता पुढचा नंबर अजय देवगण (Ajay Devgan) याचा. होय, सिंघमने मुंबईच्या जुहू भागात नवा शानदार बंगला खरेदी केला आहे.
अजयने खरेदी केलेल्या या बंगल्याची किंमत 60 कोटी रूपये असल्याचे कळतेय.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 5 हजार 590 चौरस फुटांमध्ये विस्तारलेल्या या बंगल्यात पार्किंगसाठी खास व्यवस्था आहे. सुंदर गार्डन आणि एक लहानसा स्वीमिंग पूलही आहे. अजयने गेल्यावर्षीच हा बंगला खरेदी केला होता. पण ताबा मिळायला वर्ष लागलं.
अजयने खरेदी केलेल्या या बंगल्याचे नाव ‘शक्ती’ आहे. या बंगल्याची मूळ किंमत 65 ते 70 कोटी होती. मात्र कोरोना महामारीमुळे रिअल इस्टेस्ट मार्केटमध्ये मंदी आहे. याचा लाभ घेत अजयने घाईघाईत हा बंगला खरेदी केला. यासाठी त्याने 60 कोटी रूपये मोजलेत. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय व काजोल गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. यादरम्यान एका मित्राने त्यांना या बंगल्याबद्दल सुचवले. अजय व काजोलने हा बंगला पाहिला आणि पाहताक्षणीच तो त्यांना पसंत पडला.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच या बंगल्याचे खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण आणि त्याची आई वीणा विरेंद्र देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला. अजय देवगणने बंगल्याचे नुतनीकरण सुरू आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, बंगल्यात काही बदल केले जाणार असल्याचे कळतेय. लवकरच अजय या बंगल्यात राहायला येणार असल्याचेही मानले जात आहे.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर येत्या काळात त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
यात मैदान, भूज- द प्राईड ऑफ इंडिया, थँक गॉड या सिनेमांमा समावेश आहे. याशिवाय ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमातही तो झळकणार आहे.