'सिंघम अगेन'नंतर अजय देवगणचा 'आझाद'! अभिनेत्याचा भाचा आणि रवीना टंडनच्या लेकीचं पदार्पण, पाहा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 15:08 IST2024-11-05T15:08:05+5:302024-11-05T15:08:35+5:30
अजय देवगणच्या नव्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आझाद' असं या सिनेमाचं नाव असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सिंघम अगेन'नंतर अजय देवगणचा 'आझाद'! अभिनेत्याचा भाचा आणि रवीना टंडनच्या लेकीचं पदार्पण, पाहा टीझर
अजय देवगण सध्या त्याच्या 'सिंघम अगेन' सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना दुसरीकडे अजय देवगणने त्याच्या चाहत्यांना अजून एक सरप्राइज दिलं आहे. अजय देवगणच्या नव्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आझाद' असं या सिनेमाचं नाव असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आझाद' सिनेमाच्या १.४७ मिनिटांच्या टीझरमध्ये चित्रपटातील काही सीन्सची झलक दाखविण्यात आली आहे. या सिनेमातून आपल्या मालकाप्रती निष्ठा असणाऱ्या घोड्याची कथा दाखविण्यात येणार असल्याचं टीझर पाहून लक्षात येईल. टीझरच्या सुरुवातीला लढाई होत असल्याचं दिसत आहे. त्यातच घोड्यावरुन अजय देवगणची एन्ट्री होत असल्याचं दिसत आहे. "हर बहादूर योद्धा के पास एक वफादार घोडा जरूर राहा है", असे टीझरमधील काही डायलॉग लक्ष वेधून घेत आहेत.
या सिनेमातून अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा टंडन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'आझाद' सिनेमाच्या टीझरमध्ये अमनचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. तर राशाची झलकही दिसत आहे. प्रग्या कपूर आणि रॉनी स्क्रूवाला यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अभिषेक कपूर यांचं दिग्दर्शन आहे. जानेवारी २०२५ मध्ये 'आझाद' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.