'या' क्रिकेटपटूचा येणार बायोपिक! 'मैदान'नंतर अजय देवगणच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:11 PM2024-03-22T14:11:36+5:302024-03-22T14:19:08+5:30
अभिनेता अजय देवगनसाठी 2024 हे वर्ष यशस्वी ठरणार आहे.
अभिनेता अजय देवगनसाठी 2024 हे वर्ष यशस्वी ठरणार आहे. यंदा अजयचे अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. यापैकी एक म्हणजे 'मैदान'. मैदान हा चित्रपट एक बायोपिक आहे, ज्यामध्ये अजय हा सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारत आहे. ज्यांना फुटबॉलचा शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. या चित्रपटानंतर अजय आणखी एका स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. अजय देवगण या चित्रपटाशी अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून जोडला जाणार आहे.
आपल्या देशात असे अनेक कतृत्ववान लोक आहेत. ज्यांचा इतिहास दडलेला आहे. अशाच व्यक्तीमधील एक नाव म्हणजे क्रिकेटपटू पालवणकर बाळू. क्रिकेट अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या 'ए कॉर्नर ऑफ ए फॉरेन फिल्ड: द इंडियन हिस्ट्री ऑफ ए ब्रिटिश स्पोर्ट' या पुस्तकात तसंच 'क्रिकेट, कास्ट अँड द पालवणकर ब्रदर्स' या सबऑल्टर्न स्पोर्ट्स पुस्तकात बाळूंच्या कारकिर्दीविषयी तपशीलवार लिहिलं आहे.
जातीभेदावर मात करून मैदानावर त्यांनी आपलं हक्काचं स्थान पटकावलं होतं. आज त्याची गणना दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, पण त्याचा मार्ग सोपा नव्हता. पालवणकर बाळू हे भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांचे कौटुंबिक नाव रत्नागिरी, महाराष्ट्रातील त्यांचे मूळ ठिकाण 'पालवाणी' येथून आले आहे.
संपूर्ण कारकिर्दीत त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला होता. आता अजय देवगण, तिग्मांशू धुलिया आणि प्रीती विनय सिन्हा या खेळाडूवर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्यावरील या सिनेमाचे शूटिंग वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. अजयच्या वर्कफ्रंटबद्दलो बोलायचे झाल्यास नुकताच त्याचा शैतान हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच अजय लवकरच 'सिंघम अगेन', 'रेड २' या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.